महापालिकेच्या इतिहासात पहिलीच वेळ

नाशिक : महापौर निवडणुकीसाठी फोडाफोडीचे राजकारण, समीकरण जुळविण्याचे प्रयत्न जोमात सुरू असताना मंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभा गणसंख्येअभावी तहकूब करण्याची नामुष्की महापौरांवर ओढावली. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक स्वतंत्रपणे सहलीला गेल्यामुळे सभेत केवळ आठ नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेच्या इतिहासात महापौरांच्या कार्यकाळातील अखेरची सभा अशा पद्धतीने तहकूब होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मासिक सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित झाली होती. २२ नोव्हेंबरला महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. राज्यातील बदलत्या समीकरणाने महापालिकेतील भाजपच्या सत्तेला धक्का देण्याची तयारी शिवसेना विरोधकांच्या मदतीने करण्याच्या प्रयत्नात आहे. स्पष्ट बहुमत असूनही कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने आपल्या नगरसेवकांना कोकणमार्गे गोव्यात सहलीला पाठवले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना मुंबईला मार्गस्थ केले. त्याचे अनुकरण काँग्रेस, राष्ट्रवादीने केले.

या स्थितीत महापौरपदाच्या कार्यकाळातील अखेरची सभा कदाचित आधीच रद्द केली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती, परंतु तसे घडले नाही. महापौर रंजना भानसी यांच्या कार्यकाळातील ही अखेरची सभा होती.  सभेवेळी सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, बाजीराव भागवत, डॉ. हेमलता पाटील, गजानन शेलार, गुरूमित बग्गा, सुनील गोडसे, सलीम शेख असे काही निवडक सदस्य उपस्थित होते. माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन, गायिका गीता माळी, पालिकेचे अभियंता अनिल नरसिंगे यांच्यासह दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून सर्वसाधारण सभा तहकूब केली जात असल्याचे महापौरांनी जाहीर केले. गणसंख्येअभावी सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढावली. सभेत विविध विकास कामांशी निगडित अनेक विषय पत्रिकेत होते. सभेचे कामकाज होऊ न शकल्याने कोटय़वधींची कामे रखडणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

नगरसेवक सहलीला गेले

सेना, भाजपमधील केवळ महापौरपदासाठी इच्छुक असे काही निवडक नगरसेवक वगळता सर्व जण सहलीला गेले आहेत. मनसे, अपक्ष वगळता फारसे नगरसेवक शहरात नाहीत.त्यामुळे मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा गणसंख्येअभावी तहकूब करावी लागली.