नाशिकचे महापौर पद सर्वसाधारण गटासाठी राखीव

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणात जाहीर झालेल्या महापौर आरक्षण सोडतीत नाशिकचे महापौर पद सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटातील इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. बदलत्या परिस्थितीत भाजपला कोंडीत पकडण्याची संधी विरोधकांना या निवडणुकीत मिळणार आहे. महापौर पद सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्याने सत्ताधारी आणि विरोधी गटातील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

रंजना भानसी यांची महापौरपदाची मुदत १५ सप्टेंबर २०१९ रोजी संपणार होती. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुदत संपणाऱ्या महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली गेली. यामुळे १५ डिसेंबर रोजी ही मुदत संपत आहे. नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. राज्यातील सत्तेवरून पायउतार झालेल्या भाजपला महापौर निवडणुकीत घेरण्याची रणनीती विरोधक आखत आहेत. महापालिकेत भाजपचे ६५, शिवसेनेचे ३४, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, मनसेचे पाच, अपक्ष तीन असे संख्याबळ आहे.

विधानसभा निवडणुकीत दोन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. महापौर पदासाठी ६१ चा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. विरोधकांची भिस्त भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडून उपलब्ध होणाऱ्या रसदवर अवलंबून राहील. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापणाऱ्या भाजपला धक्का देण्याची संधी सानप यांना या निवडणुकीतून मिळणार आहे.

इच्छुकांची मांदियाळी

राज्यात सत्ता स्थापनेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे नवे समीकरण आकारास येण्याची चिन्हे आहेत. पुढील काही दिवसांत सत्ता स्थापन झाल्यास त्याचे परिणाम या निवडणुकीवर दिसतील. भाजपकडे जादुई आकडा गाठण्याइतके संख्याबळ आहे. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष यांचा आकडा ५५ पर्यंत जातो. भाजपकडून सतीश कुलकर्णी, दिनकर पाटील, उद्धव निमसे, संभाजी मोरुस्कर, शशिकांत जाधव, हिमगौरी आडके असे अनेक इच्छुक आहेत. विरोधकांची मोट बांधून विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर मैदानात उतरू शकतात. काँग्रेस, राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी असल्याने त्यांच्याकडून कोणी मैदानात उतरण्याची फारशी शक्यता नाही.

मालेगाव महापालिकेतील समीकरणे

मालेगाव महापालिकेचे महापौरपद बीसीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्या महापालिकेत काँग्रेसचा महापौर आणि शिवसेनेकडे उपमहापौरपद आहे. महापौर शेख रशिद यांच्या पत्नी ताहेरा शेख या प्रमुख दावेदार असतील. विरोधी महागटबंधनकडून शान ए हिंद या प्रमुख दावेदार आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेची आधीपासून युती आहे. आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल राष्ट्रवादीतून एमआयएममध्ये गेल्यामुळे समीकरणे बदलू शकतात. या पक्षांतरामुळे विरोधी महागटबंधन मजबूत झाली आहे. यामुळे महापौरपदाची निवडणूक चुरशीची होईल असे चित्र आहे.