शहराध्यक्षपदी अनिल मटाले, पक्ष सरचिटणीसपदी अशोक मुर्तडक              

महापालिका निवडणुकीपासून मरगळलेल्या अवस्थेत राहिलेल्या मनसेला नवी उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट केला आहे. त्यानुसार शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अनिल मटाले, तर पक्षाच्या सरचिटणीसपदी माजी महापौर अशोक मुर्तडक यांना बढती दिली आहे. शहराध्यक्षपद आणि प्रदेश उपाध्यक्ष पदाची एकाच वेळी जबाबदारी सांभाळणाऱ्या राहुल ढिकले यांना शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

कधी काळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आलेल्या नाशिकमध्ये पक्षाची स्थिती अवघ्या काही वर्षांत बिकट  झाली. तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतरही पक्षाला सत्ताकेंद्र कायम ठेवणे शक्य झाले नाही. उलट पालिकेतील सत्ता काळात स्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास दाखवत पक्षाला सोडचिठ्ठी देणे पसंत केले होते. यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवेळी मनसेच्या तंबूत नगरसेवकांची संख्या कमी राहिली.

या सर्व घडामोडींचा प्रभाव निवडणुकीवर पडला. महापालिका निवडणुकीत मनसेचे ३९ वर असणारे संख्याबळ वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत अवघ्या पाचवर आले. मनसेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाची इतकी बिकट स्थिती होईल याची खुद्द राज ठाकरे यांनादेखील कल्पना नव्हती. अनेक विकासकामे करूनही मते न मिळाल्याने नाराज झालेले राज ठाकरे कित्येक महिने नाशिककडे फिरकलेदेखील नव्हते. एक-दीड महिन्यापूर्वी राज यांनी प्रथमच नाशिकला येऊन मनसेला उभारी देण्याचा प्रयत्न केला. मुळात महापालिका निकालानंतर पक्ष संघटनेत बदल अपेक्षित होते. या संदर्भात काही पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावाही सुरू होता.

महापालिकेत मनसेचे पाच नगरसेवक असले तरी त्यांनी भाजपसोबत जुळवून घेतल्याचे चित्र आहे. यामुळे अत्यल्प संख्याबळ असतानाही आरोग्य समितीचे उपसभापतिपद मनसेच्या पदरात पडले. कधी काळी गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या मनसेच्या राजगड कार्यालयातील वर्दळ कमी झाली. वरिष्ठ पदाधिकारी फिरकेनासे झाले. काही पदाधिकारी काम करीत असले तरी पक्षातील चैतन्य हरपल्याचे दृष्टिपथास पडत होते.

या पाश्र्वभूमीवर, मनसेने संघटनात्मक बदल करीत नव्याने तयारी सुरू केली आहे. मागील दोन वर्षांपासून मनसेच्या शहराध्यक्षपदाची धुरा अ‍ॅड.  राहुल ढिकले सांभाळत होते. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. या संदर्भात गुरुवारी मुंबईत राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. चर्चेअंती माजी महापौर अशोक मुर्तडक यांना प्रदेश सरचिटणीसपदी बढती देण्यात आली. शहराध्यक्षपदाची धुरा माजी नगरसेवक अनिल मटाले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

संघटनात्मक विस्तारासाठी काय करता येईल याबद्दल राज यांनी मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज यांनी पायाभरणी सुरू केली असली तरी मनसे नगरसेवकांचे भाजपशी असणारे सख्य पक्षासाठी अडचणीचे ठरणारे आहे. भाजपच्या कारभारावर राज हे सातत्याने टीकास्त्र सोडत असताना स्थानिक पातळीवर मनसे त्याच पक्षाशी जुळवून घेत आहे. हा विरोधाभास संघटनात्मक बदलानंतर कायम राहील काय, याविषयी मनसेच्या गोटात चर्चा होत आहे.

महापालिका निवडणुकीत मनसेचे ३९ वर असणारे संख्याबळ वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत अवघ्या पाचवर आले. मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाची इतकी बिकट स्थिती होईल याची खुद्द राज ठाकरे यांनादेखील कल्पना नव्हती. अनेक विकासकामे करूनही मते न मिळाल्याने नाराज झालेले राज ठाकरे कित्येक महिने नाशिककडे फिरकलेदेखील नव्हते. एक-दीड महिन्यापूर्वी राज यांनी प्रथमच नाशिकला येऊन मनसेला उभारी देण्याचा प्रयत्न केला