नाशिक-मुंबई विमान सेवा पुन्हा रद्द; एअर डेक्कनला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

महिनाभरापासून बंद असणारी नाशिकची विमान सेवा सांगितल्याप्रमाणे शुक्रवारीदेखील कार्यान्वित होऊ शकली नाही. ऐन वेळी एअर डेक्कन कंपनीने तांत्रिक कारण देऊन ही सेवा रद्द केली. परिणामी, नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे या विमान सेवेचे भवितव्य पुन्हा अधांतरी झाले आहे. एअर डेक्कन कंपनीने  योजनेच्या मूळ उद्देशाला सुरुंग लावल्याचा आरोप खा. हेमंत गोडसे यांनी केला असून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मागील काही वर्षांपासून हवाई नकाशावर नाशिकचे स्थान डळमळीत राहिले आहे. केंद्र सरकारने उडाण योजनेंतर्गत सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात नाशिकची विमानसेवा तीन महिन्यांत पुन्हा ठप्प झाली. चार महिन्यांपूर्वी नाशिकसह जळगाव शहरातून वाजतगाजत विमान सेवेचे उद्घाटन झाले होते. परंतु तांत्रिक कारणास्तव बहुतांश ठिकाणची विमानसेवा बंद पडली. कंपनीकडे प्रशिक्षित वैमानिकांची कमतरता आहे. जे वैमानिक भरती केले, त्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू असल्याचे मागील महिन्यात कंपनीने हवाई वाहतूक विभागाला सांगितले होते.

उन्हाळी हंगामासाठी नाशिकसह राज्यातील विमान सेवेच्या वेळापत्रकाची पुनर्रचना करण्यात आली. नाशिक-मुंबई विमान सेवेची वेळ बदलल्याने मुंबईला जाणे सोयीस्कर झाल्याचे वाटत असताना ऐन वेळी पुन्हा भ्रमनिरास झाला. तांत्रिक कारणास्तव बंद पडलेली विमान सेवा महिनाभरानंतर अर्थात २० एप्रिलपासून नव्याने सुरू करताना नाशिक-मुंबई विमान प्रवासाची वेळ सकाळी करण्यात आली होती.

उन्हाळी हंगामाचे वेळापत्रक नागरी हवाई वाहतूक विभागाने जाहीर केले होते. त्यात नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी सकाळी सहा वाजता तर मुंबईहून नाशिकला येण्यासाठी सायंकाळी पावणेसहा वाजता ही सेवा राहील, असे सांगितले गेले. तथापि, या मुहूर्तावर कंपनीचे विमान अवकाशात झेपावूशकले नाही.

वैमानिक, मुंबईतील विमानतळावर अवतरणासाठीची वेळ अशी काही कारणे पुढे करीत कंपनीने नाशिकहून मुंबईला जाणारे विमान रद्द झाल्याचे ऐन वेळी जाहीर केले. या घडामोडींमुळे प्रवासी, विमान सेवेसाठी पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी, विमान तिकीट नोंदणी करणाऱ्या व्यावसायिकांनी एअर डेक्कनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कोणतेही स्पष्ट कारण न देता ही सेवा रद्द केली. प्रारंभीच्या तीन महिन्यात एअर डेक्कनला नियमित सेवा देता आलेली नाही.

१० ते १५ वेळा अकस्मात विमान रद्द करण्याचे प्रकार घडले. त्याच्या वेळापत्रकाचे पालन झाले नव्हते. या परिस्थितीत कंपनीने पुन्हा तोच कित्ता गिरवल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

केंद्र सरकारच्या उडाण योजनेच्या मूळ उद्देशाला एअर डेक्कनने सुरुंग लावला आहे. सरकारची अतिशय चांगली योजना कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सुरळीतपणे अमलात येऊ शकलेली नाही. एअर डेक्कनची विमानसेवा चालविण्याची क्षमता नाही. दरवेळी वेगवेगळी कारणे पुढे केली जातात. उडाण योजनेच्या उद्देशाला हरताळ फासणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई होणे गरजेचे आहे.

खा. हेमंत गोडसे