News Flash

खाटांसाठी खटाटोप

‘व्हेंटिलेटर’सह प्राणवायुयुक्त खाटांसाठी अधिक विचारणा 

(संग्रहित छायाचित्र)

*   नियोजन करताना प्रशासनाची तारांबळ; * ‘व्हेंटिलेटर’सह प्राणवायुयुक्त खाटांसाठी अधिक विचारणा 

* खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची बोळवण

नाशिक : करोना रुग्णांसाठी ३९ खासगी रुग्णालयात ११४१ खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यांचे वितरण महापालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण प्रणालीतून सुरू झाल्यानंतर प्राणवायू आणि व्हेंटिलेटर व्यवस्था असणाऱ्या खाटांसाठी महानगरपालिकेच्या विविध मदत वाहिन्यांवर दूरध्वनीचा अक्षरश: पाऊस पडत आहे. त्याचे नियोजन करताना प्रशासनाला खटाटोप करावा लागत असून ज्या रुग्णांना कक्षाने वेगवेगळ्या रुग्णालयात संदर्भित केले, ते तिथे दाखल झाले की नाही याची स्पष्टता होत नसल्याने गोंधळात भर पडत आहे.

खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर महानगरपालिकेने खासगी रुग्णालयातील खाटांचे आरक्षण आणि देयकांबाबतच्या तक्रारींसाठी मदतवाहिनी उपलब्ध केली आहे. काही खासगी रुग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अवास्तव देयक आकारणी केल्याचे चौकशीत उघड झाले होते. त्यामुळे आता प्रत्येक रुग्णालयात देयकांची छाननी केली जात आहे. खासगी रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याचे कारण देऊन रुग्णालये रुग्णांची बोळवण करीत आहेत.

मध्यंतरी अकस्मात रुग्णालयांच्या तपासणीत जिल्ह्य़ातील रुग्ण मोठय़ा संख्येने उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले होते. नंतर महापालिकेने पूर्वपरवानगीशिवाय खाटा देऊ नये, असे खासगी रुग्णालयांना निर्देश दिले.

करोनासाठी निश्चित केलेल्या रुग्णालयात खाटांचे नियोजन करण्यासाठी आता मध्यवर्ती संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.

करोनासाठी १४ खासगी रुग्णालयात एकूण ६३० आणि २५ खासगी रुग्णालयातील ५११ खाटा अंशत: आरक्षित आहेत. त्यांचे महापालिका संगणकीय प्रणालीद्वारे मध्यवर्ती नियंत्रण सुरू केले. या प्रणालीद्वारे रुग्णालयात भरती झालेले रुग्ण आणि रिक्त खाटांची अचूक माहिती प्राप्त होईल.

त्यानुसार खाटांचे नियोजन केले जाणार आहे. करोनाबाधित रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी मदत वाहिनीवर संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी प्राणवायू, व्हेंटिलेटरची व्यवस्था असणाऱ्या खाटांची मागणी केली. तथापि, अनेक खासगी रुग्णालयात तशा खाटा उपलब्ध नसल्याचे दिसून आले. संबंधितांना खाटांची व्यवस्था करताना मदत वाहिनी केंद्राला धडपड करावी लागत आहे.

करोनाविषयक माहितीसाठी कार्यान्वित केलेल्या अन्य मदतवाहिनीवर विविध तक्रारी होत आहेत. यात बाधित रुग्ण घराबाहेर फिरत आहे. प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावला नाही. प्रतिबंधित क्षेत्रात फवारणी होत नसल्याचा समावेश आहे.

करोनासाठीच्या मदतवाहिनी

* खासगी रुग्णालयात खाटा आरक्षण  ९६०७६२३३६६

* करोनाविषयक माहिती ९६०७४३२२३३ आणि ०२५३-२३१७२९२

* खासगी रुग्णालय अवास्तव देयक तक्रार ९६०७६०११३३

मध्यवर्ती यंत्रणेमार्फत खाटांचे वितरण करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. खाटांसाठी सकाळपर्यंत १२ जणांनी संपर्क साधला. त्यांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. व्हेंटिलेटर, प्राणवायुची व्यवस्था असलेल्या काही खासगी रुग्णालयांच्या खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. नव्या रुग्णालयात तशा व्यवस्थेच्या काही खाटा शिल्लक आहेत. खाटांची कमतरता नाही.  लक्षणांनुसार रुग्णाने कुठे जावे याबाबत डॉक्टर मार्गदर्शन करतात. प्रत्येक रुग्णालयात समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णालयाने प्रणालीत लगेच माहिती न भरल्यास स्पष्टता होत नाही. नवीन व्यवस्था असून ती लवकरच सुरळीत होईल.

– नितीन गावंडे,उपजिल्हाधिकारी तथा महापालिका करोना मदत वाहिनी केंद्राचे प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 3:52 am

Web Title: nashik municipal administration facing difficulties for managing beds for covid 19 patients zws 70
Next Stories
1 मुखपट्टी न वापरणाऱ्या १६ हजार बेशिस्तांविरुध्द कारवाई
2 ऑनलाइन शिक्षणासाठी ‘डिव्हाईस डोनेशन’
3 दारणा खोऱ्यातून सहावा बिबटय़ा जेरबंद
Just Now!
X