२०१६-१७ चे अंदाजपत्रक आज सर्वसाधारण सभेत
महापालिकेचे २०१६-१७ वर्षांचे अंदाजपत्रक मंगळवारी सर्वसाधारण सभेत मांडले जाणार असताना स्थायी समितीने त्याचे इतिवृत्त मंजूर केले नसल्याची बाब पुढे आल्यानंतर सोमवारी स्थायीच्या सभेत त्यास मंजूरी देण्यात आली. यावेळी अंदाजपत्रकातील फुगवटय़ावरून आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायीची उलट तपासणी केल्याचे पहावयास मिळाले. महापालिकेच्या अंदाजपत्रकात आकडेवारी मोठय़ा प्रमाणात वाढविली जाते. प्रत्यक्षात त्यानुसार उत्पन्न हाती पडत नसल्याचा अनुभव आहे. हा धागा पकडून त्यांनी विचारणा करत या अनुषंगाने अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची सूचना केली.
महापालिकेचे २०१६-१७ वर्षांतील अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर आधीच सादर झाले आहे. प्रशासनाने सादर केलेल्या १३५७ कोटीच्या अंदाजपत्रकात स्थायीने ३३७ कोटींनी वाढ करत ते १६९४ कोटींवर नेले आहे. मंगळवारी सर्वसाधारण सभेसमोर हे अंदाजपत्रक ठेवले जाणार असताना स्थायी समितीने त्याचे इतिवृत्त मंजूर केले नसल्याची बाब उघड झाली. या पाश्र्वभूमीवर, सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठक कार्यवृत्त मंजुरीची असली तरी पालिका आयुक्तांनी अंदाजपत्रकात होणाऱ्या वाढीवरून स्थायीसह पालिका अधिकाऱ्यांचे कान टोचले. अंदाजपत्रकात दरवर्षी अशी मोठी वाढ होत आहे. गतवर्षीचे अंदाजपत्रक १९९२ कोटी रुपयांचे होते. प्रत्यक्षात ८६२ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले. अपेक्षित उत्पन्न गृहीत धरताना नेमकी काय चूक झाली, कर संकलनात अधिकारी कुठे कमी पडतात याची शहानिशा करून जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.
महापालिका आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक १३५७ कोटी रुपयांचे आहे. स्थायीने त्यात ३३७ कोटींची वाढ सुचविली आहे.