*  रुग्णांच्या नातेवाईकांना बैठक व्यवस्थेपासून वाहनतळ करण्याविषयी सूचना *  डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील परिस्थितीचा आयुक्तांकडून आढावा

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय परिसरात आवश्यक कामे पूर्ण करण्याची सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, पोलिसांसाठी चौकी, वाहनतळ  अशी व्यवस्था करण्यास आयुक्तांनी सांगितले आहे.

गुरुवारी आयुक्त गमे यांनी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयातील पीबीएक्स दूरध्वनींची संख्या वाढविण्यात यावी, सर्व खोल्यांमध्ये आवश्यक माहिती पोहचविण्यासाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करण्यासंदर्भात त्यांनी सांगितले. रूग्णालयात पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठय़ाची त्यांनी माहिती घेतली. रुग्णालयातील वैद्यकीय आणि इतर कर्मचाऱ्यांना थांबण्याच्या दृष्टीने व्यवस्था करावी, रुग्णांची दक्षता घेत असतांना कर्मचाऱ्यांनी स्वत:चीही दक्षता घ्यावी, असेही गमे यांनी सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यासोबतच रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णावर काय उपचार सुरू आहेत, याची माहिती देण्याचे निर्देश गमे यांनी दिले. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील डॉ. राहुल पाटील यांच्याशी गमे यांनी चर्चा करून रुग्णालयातील अडचणी तसेच गंभीर रुग्णांची माहिती घेतली. या ठिकाणी उपलब्ध औषधसाठा, संरक्षक वस्त्रे याविषयी माहिती घेऊन अपूर्ण सुविधा, नव्या सुविधांची आवश्यकता, याविषयी निर्णय घेण्याची सूचनाही गमे यांनी संबंधित विभागाला केली. कार्यरत कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.

आयुक्त गमे यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, करोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नितीन रावते, संध्या सावंत, स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट आदी उपस्थित होते.

शहरात सर्वेक्षण

महानगरपालिकेच्या वतीने शहरात करोनाविषयी मनपा शिक्षकांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात शहरातील नागरिकांचे तापमान मोजणे, ऑक्सिजन, नाडीचे आणि हृदयाचे ठोके मोजणे, कुटुंबातील सर्व सदस्यांची खोकला, दमा, रक्तदाब, मधुमेह अस्थमा, क्षयरोग, मूत्रपिंडाचे विकार, अंथरुणावर खिळलेले रुग्ण, गरोदर माता, इतर आजार, हृदयरोग आदीसंबंधी माहिती देण्यात आली. नागरिकांनी योग्य ती माहिती द्यावी आणि शिक्षकांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.