स्थायी समिती सभेत तुकाराम मुंढे यांची अनुपस्थिती

नाशिक : विविध समस्यांच्या मुद्यांवरून सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी आडमार्गाने आयुक्तांवर शरसंधान साधले. स्थायी समितीच्या सभेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे अनुपस्थित असल्याचे लक्षात आल्यावर सावध विधाने करणाऱ्या  सदस्यांनी काही प्रस्तावावरून आयुक्तांना लक्ष्य करण्यास यावेळी धन्यता मानली.

मोकाट जनावरे, भटकी कुत्री, डुकरांचा वाढता उपद्रव याविषयी स्थायीच्या सभेत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आतापर्यंत ७२ हजार कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले. यावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. ही शस्त्रक्रिया प्रामुख्याने मादी श्वानांवर होणे गरजेचे आहे. मोकाट कुत्रे पकडताना तो निकष पाळला गेला नाही. दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करूनही कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. या कामात सावळागोंधळ असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

उघडय़ावरील मांस विक्री बंद करावी, असे निर्देश देऊनही कारवाई झाली नाही. पशु संवर्धन विभागाच्या कारभाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. अखेर संबंधितांना नोटीस बजावून खुलासा मागविण्याचा निर्णय झाला.

महात्मानगर भागात सायकल ट्रॅकच्या विषयावरूनही भाजपचे उद्धव निमसे यांनी आयुक्त अशी कामे करताना श्रीमंत-गरीब असा भेदभाव करीत असल्याचा आरोप केला. महात्मानगर ही उच्चभ्रूंची वसाहत आहे. त्या ठिकाणी सायकल ट्रॅकचा जसा विचार केला जातो, तसा शेतकऱ्यांचे वास्तव्य असलेल्या नांदूर परिसराचा विचार होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आयुक्त श्रीमंतांच्या पाठीशी उभे असून गरीबांकडे ते लक्ष देत नसल्याची टीका त्यांनी केली. सदस्यांची भावना लक्षात घेऊन सभापतींनी हा विषय तहकूब ठेवला.

दरम्यान, मागील आठवडय़ात स्थायीच्या सभेत भटके कुत्रे, मोकाट जनावरे, डुकरांचा उपद्रव हा विषय चांगलाच गाजला होता. त्यावेळी आयुक्त उपस्थित होते. तेव्हा त्यांच्या प्रस्तावांचे स्वागत करताना सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याची धडपड केली होती. मात्र, गुरुवारच्या सभेत आयुक्त अनुपस्थित असल्याचे पाहून गतवेळी सावध विधाने करणाऱ्या भाजप सदस्यांनी आपला पवित्रा बदलल्याचे यावेळी दिसले.

आयुक्तांच्या वृक्षारोपणावर आक्षेप

बारा हजार झाडे लावण्याच्या प्रस्तावावरून सदस्यांनी आयुक्तांना कोंडीत पकडण्याची धडपड केली. राज्य शासनाच्या वन महोत्सवातंर्गत महापालिकेला शहरात १२ हजार वृक्षारोपण करायचे आहे. त्यासंबंधीच्या प्रस्तावावर दिनकर पाटील यांनी वृक्ष लागवडीचे काम दिले नसताना आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी वृक्षारोपण कसे केले, असा प्रश्न उपस्थित केला. मोठय़ा संख्येने झाडांची लागवड करताना संरक्षक जाळीचा विचार केला गेला नाही. वृक्ष लागवडीसाठी तीन महिने आधीच खड्डे कसे खोदले गेले, असे प्रश्न उपस्थित केले. यावर प्रशासनाने वृक्ष लागवडीसाठी खोदलेले खड्डे बुजले असल्यास ठेकेदाराकडून वसुलीचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. तसेच १० फूट उंचीच्या झाडांना संरक्षक जाळी लावण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.