सभागृहात भाजप नेत्यांच्या प्रतिमा लावण्याचे ‘मनोगत’

महापालिका निवडणुकीत सत्ता मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने प्रचारादरम्यान जाहीर न करण्यात आलेला मुख्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचे संकेत मिळत आहेत. महापालिका संकुलास तत्कालीन जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यासह सभागृहातही पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा लावण्याचे ‘मनोगत’ भाजपशी संबंधित एका विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे

महापालिकेत विरोधक म्हणून कित्येक वर्ष काढणारा भाजप आता सत्ता मिळाल्यावर शहर विकासासाठी कोणत्या योजना आखणार आणि राजकीय कार्यक्रमांची अमलबजावणी करणार, याविषयी सर्वच उत्सुक आहेत. महापौरपदाचा कार्यभार स्वीकारून रंजना भानसी यांना आठवडाही उलटत नाही तोच प्रदेश भाजपच्या प्रकाशन विभागाचे राज्य संयोजक रवींद्र अमृतकर यांनी महापौरांकडे दिलेला प्रस्ताव नाशिककरांच्या सोईचे निमित्त पुढे करून दिला गेला आहे.

नाशिक महापालिकेची वास्तू ‘राजीव गांधी भवन’ म्हणून परिचित आहे. जवळच ‘रामायण’ हा महापौर बंगला आहे. महापालिकेची वास्तू शरणपूर रस्त्यावर, तर महापौर बंगला टिळकवाडी रस्त्यावर आहे. या दोन्ही वास्तू एकाच आवारात असून एका प्रवेशव्दारातून दोन्ही वास्तूंमध्ये ये-जा करता येते. याविषयी समस्त नाशिककर चांगलेच परिचित असताना अमृतकर यांनी महापौर बंगला आणि महापालिका वास्तू यांची ओळख स्वतंत्र ठेवून नागरिकांच्या सोईसाठी या संपूर्ण संकुलास एकाच नावाने ओळखले जाणे हितावह असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि रामायण बंगल्याच्या प्रवेशद्वारावर ‘दीनदयाळ संकुल’ असे नांव टाकून त्यामध्ये राजीव गांधी भवन आणि रामायण या वास्तूंची नावे कायम असावीत असा ठराव संमत करण्याची मागणी अमृतकर यांनी महापौरांकडे केली आहे.

याशिवाय पालिका सभागृहात असणाऱ्या महापुरुषांच्या आणि विशिष्ट नेत्यांच्या प्रतिमांचे योग्य ते वर्गीकरण करून त्यात वाढ करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे. सध्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, शिवाजी महाराज, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, बाळासाहेब ठाकरे या दिवंगत महापुरूषांच्या प्रतिमा आहेत. त्यात काही बदल पत्रात सुचविण्यात आले असून मध्यभागी स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांसह शाहू महाराज, पंडित दीनदयाळ उपाध्याय या महापुरूषांच्या प्रतिमा असाव्यात, तर डाव्या बाजुला पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, बाळासाहेब ठाकरे आणि उजव्या बाजुला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांच्या प्रतिमा लावण्याची सूचना अमृतकर यांनी केली आहे. भाजपशी संबंधित नेत्यांच्या प्रतिमा नव्याने लावण्यास इतर राजकीय पक्षांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही प्रतिमा लावावी, अशी चलाखी केली आहे. शहरातील सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आणि विकासाची संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी अशाच प्रकारचे काम आपल्या नेतृत्वाखाली महानगर पालिकेत होईल, असा विश्वासही अमृतकर यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. अमृतकर हे भाजपचे प्रदेश मुखपत्र ‘मनोगत’ चे समन्वयकही आहेत.