News Flash

घर घेताय.. आधी बांधकाम नकाशे तपासा

लवकरच ले-आऊटचे नकाशे याच पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

नाशिक महापालिकेतर्फे इमारतींचे नकाशे संकेतस्थळावर

‘आयुष्याची कमाई घर विकत घेण्यासाठी गुंतवताना पालिकेचे नकाशे तपासा आणि नकाशाप्रमाणे बांधकाम आहे याची खात्री करूनच नंतर खरेदी करा..’ हे आवाहन आहे नाशिक महापालिकेचे! कपाट प्रकरणावरून बांधकाम व्यावसायिक आणि पालिका आयुक्त यांच्यात थेट जुंपली असताना महापालिकेने या व्यवहारात सर्वसामान्य ग्राहक भरडला जाऊ नये यासाठी ग्राहकांच्या सुविधेसाठी विविध इमारतींचे नकाशे थेट संकेतस्थळावर टाकण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ले-आऊटचे नकाशे याच पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून चटई क्षेत्राचे उल्लंघन करून शहरात झालेल्या इमारतींच्या बांधकामांचे अर्थात कपाटाचे प्रकरण गाजत आहे. निवासयोग्य खोलीत कपाट दाखवत बांधकाम परवानगी घेऊन नंतर प्रत्यक्षात त्याऐवजी खोलीचे क्षेत्रफळ वाढवून त्या आधारे अधिकच्या क्षेत्रफळाच्या सदनिकांची विक्री झाल्याची बाब पालिकेने उघड केली आहे. या प्रकरणात विकासकांनी महापालिकेसह ग्राहकांची फसवणूक केल्याची बाब पालिकेने शासनाला कळविली; परंतु या घडामोडीनंतर विकासकांनी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच कपाट नियमित करण्यासाठी विकासकांचा शासनाकडे पाठपुरावा चालवला आहे. या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून उभयतांमध्ये जुंपली असताना पालिकेने ग्राहकांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, घर खरेदी करताना महापालिकेने इमारती व सदनिकांचे नकाशे सर्वासाठी खुले केले आहेत. यासाठी महापालिकेत जाण्याचीही गरज नाही. महापालिकेच्या संकेतस्थळावर ते समाविष्ट केले जात आहेत. ग्राहकांच्या सुविधेसाठी महापालिकेने विविध इमारती, सदनिकांचे यांचे नकाशे व परवानग्या संकेतस्थळावर उपलब्ध केल्या आहेत. लवकरच ले-आऊटसाठीदेखील ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. घर म्हणजे आयुष्यातील महत्त्वाची खरेदी. त्यात गुंतवणूक करताना महापालिकेचे नकाशे तपासावेत आणि त्यानुसार बांधकाम आहे याची खात्री करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 2:18 am

Web Title: nashik municipal corporation building maps on website
Next Stories
1 सेतू कार्यालयास दलालांचा वेढा
2 तृप्ती देसाई यांच्यासाठी कक्ष नोंदणी वादात
3 दुर्ग संवर्धनतर्फे सोनगीर किल्ल्यावर स्वच्छता
Just Now!
X