आज मतमोजणी

मतदार यादीत नाव न सापडणे, नामसाधम्र्यामुळे मतपत्रिकेतील क्रमवारीत बदल अशा काही तक्रारी वगळता महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क)च्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी दुपापर्यंत मतदारांपर्यंत निरुत्साह आढळून आला.  ऊन उतरल्यानंतर शेवटच्या दीड तासात काही केंद्रांवर मतदारांची थोडीफार गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. दुपारी साडेतीनपर्यंत केवळ २५.४२ टक्के मतदान झाले होते. उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला शनिवारी होणार आहे.

मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. मनसेकडून अ‍ॅड. वैशाली भोसले, शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण आणि भाजपच्या विजया लोणारी या प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक रंजना पवार यांनी बंडखोरी केली. काही अपक्ष उमेदवारही नशीब अजमावून पाहत आहेत. सकाळी साडेसात वाजता ६१ केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. नाशिकचा पारा ४० अंशांवर गेल्याचा परिणाम मतदानावर दिसून आला.

अतिशय संथपणे मतदानाला सुरुवात झाली. अनेक केंद्रांवर मतदार कमी आणि पोलीस तसेच इतर कर्मचारी अधिक असल्याचे पाहावयास मिळाले. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या कालावधीत २५.४२ टक्के मतदान झाले. त्यात ६८४७ पुरुष, तर ५१५८ महिला मतदारांचा समावेश आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार आहेत.

मतदान प्रक्रिया संथपणे सुरू असल्याने धास्तावलेल्या उमेदवारांनी हक्काच्या मतदारांना घराबाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित केले. काही ठिकाणी मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याची चर्चा होती. उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाल्यावर दुपारी चारनंतर मतदान केंद्रांवर मतदार दिसू लागले. अपक्ष उमेदवारांच्या आडनावातील साधम्र्यामुळे मतपत्रिकेतील क्रमवारीत बदल झाल्याची तक्रार एकाने केली. मनसे, भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर भेट देऊन स्थितीचे अवलोकन केले. मतदार यादीत नाव न सापडण्याचा घोळ या पोटनिवडणुकीत कायम राहिला.  बी. डी. भालेकर हायस्कूलमधील केंद्रावर तीन मतदारांची नावे सापडली नाहीत. संबंधितांनी याबद्दल जाब विचारला. इतर केंद्रांवर काही ठिकाणी या स्वरूपाच्या तक्रारी आल्याचे सांगण्यात आले. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. शनिवारी गंगापूर रस्त्यावरील शिवसत्य कला मंडळाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे.