पाहणी दौऱ्यात भाजीबाजार स्थलांतरित करण्याचे निर्देश

गोदावरी पात्रात प्रक्रिया न करताच सोडले जाणारे गटारीचे पाणी रोखण्यासाठी गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्राचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे तसेच नदीकाठालगत वसलेला भाजीबाजार गणेश वाडीच्या जागेत स्थलांतरित करावा, असे निर्देश पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. त्या अनुषंगाने कार्यवाही लगेचच सुरू झाली. मंगळवारी सकाळी मुंढे यांनी अकस्मात गोदा काठावरील रामवाडी पूल ते टाळकुटेश्वपर्यंतच्या परिसरासह गोदा पार्कची अडीच तास पायी भ्रमंती करून पाहणी केली. या दौऱ्याने अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.

पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रारंभीचे दोन दिवस शिस्त, कार्यालयीन स्वच्छता, पारदर्शक कामकाज, अर्ज-फाईल्सचा वेळेत निपटारा आदी मुद्यांवरून अधिकाऱ्यांचे कान टोचल्यानंतर मुंढे हे शहरातील प्रश्नांची स्थिती जाणून घेण्याकरीता प्रथमच कार्यालयाबाहेर पडले. स्मार्ट सिटीत समाविष्ट झालेल्या नाशिक शहरात कुंभमेळ्यापासून गोदावरी प्रदूषण गाजत आहे. या संदर्भात पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयाने निरी आणि विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत वेगवेगळ्या निर्देशांची अंमलबजावणीची सूचना केली.

मुंढे यांच्या दौऱ्याची पालिका यंत्रणेला पूर्वकल्पना नव्हती. सकाळी अकस्मात आयुक्तांचा पाहणी दौरा होणार असल्याचे संदेश मिळाल्यावर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. एरवी, पूर्वनियोजित दौऱ्याप्रसंगी अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यप्रवण करतात. उपरोक्त भागात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविली जाते. या दौऱ्यात यंत्रणेला तसे काही करण्याची संधी मिळाली नाही. यामुळे आयुक्तांना गोदावरी प्रदूषणाचे वास्तव लक्षात येण्यास मदत झाली.

चोपडा लॉन्सलगतच्या गोदा पार्क परिसरात गटारींचे पाणी प्रक्रिया न करताच थेट नदीपात्रात सोडलेले आहे. अन्य काही ठिकाणी ही स्थिती आहे. अस्तित्वातील मलनिस्सारण केंद्राची क्षमता कमी असल्याने गंगापूर येथे नव्याने केंद्राची उभारणी प्रगतीपथावर आहे. उपरोक्त केंद्र कार्यान्वित झाल्यास प्रक्रिया करून हे पाणी सोडता येईल. ही माहिती मिळाल्यावर मुंढे यांनी दौऱ्याअंती गंगापूर येथील प्रकल्पाच्या कामाची पाहणी करत ते तातडीने पूर्णत्वास नेण्याचे सूचित केले. गोदा पार्कनंतर आयुक्तांचा ताफा रामवाडी पूल येथे पोहोचला. नदी काठावरील स्थितीचे अवलोकन केले. पाण्याचा प्रवाह, त्यात येणारे अडथळे आदी बाबी जाणून घेतल्या. रामवाडी पुलालगत कचरा पडलेला दिसला. भुयारी गटार योजनेतील त्रुटी समोर आल्या. वेगवेगळ्या मुद्यांवरून त्यांनी आरोग्यासह पंचवटी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

दौऱ्यात स्मार्ट सिटी योजनेसाठी सल्लागार म्हणून कार्यरत क्रिसील संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्याकडून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रकल्प तसेच महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेतली. गोदाकाठावरील भाजीबाजार प्रदूषणाला हातभार लावतो. हा बाजार हटविण्यासाठी आजवर अनेकदा प्रयत्न झाले. हटविलेला बाजार पुन्हा काही दिवसांनी गोदावरी काठावर थाटला जातो. हा भाजीबाजार दोन दिवसात गणेशवाडीतील जागेत स्थलांतरित करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले. स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बुकाणे, कार्यकारी अभियंता संजय घुगे, एस. एम. चव्हाणके, उदय धर्माधिकारी आदी उपस्थित होते.