गुन्हेगारांनाही प्राधान्य; नाशिक महापालिकेसाठी २१९६ उमेदवारी अर्ज

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी   अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी १६०० हून अधिक उमेदवारांनी २१९६ अर्ज दाखल केले. राजकीय पक्षांनी यादी जाहीर न करता उमेदवारांना एबी फॉर्म देऊन खुष्कीचा मार्ग स्वीकारला.

तथापि, शिवसेनेत राडेबाजी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही इच्छुकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. त्यातच सेनेच्या काही उमेदवारांचे एबी फॉर्म उशिरा, तर काही जणांचे कोरे अर्जासोबत जोडले गेल्याने छाननीत त्यांची अधिकृत उमेदवारी अडचणीत येण्याची धास्ती व्यक्त होत आहे. भाजप व मनसेने गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या काही उमेदवारांना तिकिटे दिली असून सर्वपक्षीयांनी घराणेशाही जोपासल्याचे अधोरेखित होत आहे. काँग्रेस आघाडीचे त्रांगडे अखेर मिटले असून निम्म्या जागांवर संबंधितांचे मतैक्य झाले. दरम्यान, सेना-भाजपने आयारामांना प्राधान्यक्रमाने उमेदवारी दिली गेल्याने पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

राजकीय पक्षांनी अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड उडाली. बंडखोरी आणि वाद टाळण्यासाठी भाजप व शिवसेनेसह अन्य पक्षांनी आपल्या उमेदवारांना थेट एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्यास सांगितले. तथापि, यामुळे वाद कमी होण्याऐवजी अधिकच चिघळला. शिवसेनेत तर पांडे-बोरस्ते गटात हाणामारी झाली. भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना इच्छुकांनी धारेवर धरल्याने पक्ष कार्यालयातून काढता पाय घ्यावा लागला.

भाजपने काही प्रभागांत एकाच जागेवर दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचा प्रताप केला. हा घोळ निस्तरण्यासाठी नंतर नव्याने पत्र देऊन पहिल्याचा उमेदवारी अर्ज रद्द केला गेला. भाजपचे आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब आहेर यांचा मुलगा, आमदार सीमा हिरे यांचे दीर, भाजपचे विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील यांचा मुलगा अशी नेत्यांच्या घरातच अनेक तिकिटे दिली गेली. गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींना भाजपने तिकीट देण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्यात धनंजय माने याची पत्नी, हेमंत शेट्टी यांना उमेदवारी दिली गेली.

पांडे समर्थक आणि महानगरप्रमुख बोरस्ते गटात झालेल्या वादाचा फटका काही उमेदवारांना बसणार असल्याचे सांगितले जाते. या वादामुळे एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया काही काळ थांबविली गेली. हे अर्ज नंतर नाशिकरोडला नेण्यात आले. पंचवटीतील प्रभाग क्रमांक चारमध्ये चारही उमेदवारांचे एबी फॉर्म पोहोचण्यास विलंब झाला. हे अर्ज नावे न टाकताच सादर झाल्याने छाननीत ते पक्षाचे अधिकृत उमेदवार मानले जातील की नाही, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. अन्य एका उमेदवाराला झेरॉक्स प्रत मिळाल्याने त्याने संतापात अर्जच फाडून टाकला. मनसेने योगेश शेवरेला रिंगणात उतरवत गुन्हेगारीचे समर्थन केल्याची भावना मतदारांमध्ये आहे.

पांडे कुटुंबीयांची लॉटरी

उमेदवारीवरून सेनेच्या दोन गटांत हाणामारी झाली. ही संधी साधून माजी महापौर पांडे यांचा मुलगा ऋतुराज पांडेला अंतिम क्षणी भाजपने प्रभाग क्रमांक १३ ब मधून उमेदवारी दिली. इतकेच नव्हे, तर सेनेच्या अधिकृत उमेदवार कल्पना पांडे यांनाही २४ प्रभागमधून भाजपने उमेदवारी दिली गेल्याने वेगळाच तिढा निर्माण झाला. आपला पत्ता कट झाल्याचे समजल्यानंतर काही इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी करून बंडाचे निशाण फडकावले. काहींनी अन्य पक्षांतून उमेदवारी मिळवत अर्ज दाखल केले. बंडखोरी थोपविण्याचे आव्हान सेना व भाजपसमोर आहे.