पक्षनिष्ठा हा कधी काळी काँग्रेस, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांसाठी परवलीचा शब्द. पक्ष, त्याची विचारधारा यांच्याशी प्रामाणिक राहून आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून काम करणारे त्यांच्यासह इतर पक्षातही काही जण सापडतील. परंतु, गेल्या काही वर्षांत राजकीय क्षेत्रातून प्रामाणिकता, पक्षनिष्ठा लोप पावत असून त्याचे प्रत्यंतर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत येत आहे. विशेष म्हणजे, जगातील सर्वात मोठा पक्ष आणि वेगळेपणा मिरविणाऱ्या भाजपसह पक्षाशी इमान न राखणाऱ्यांना ‘गद्दार’ म्हणून हिणविणाऱ्या शिवसेनेलाही इतर पक्षीय नगरसेवकांच्या पळवापळवीतच अधिक स्वारस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार व दिग्गजांना आपल्या कळपात समाविष्ट करण्याची चढाओढ होती. त्याची पुनरावृत्ती पालिका निवडणुकीत होत असल्याने प्रामाणिकता, पक्षनिष्ठा वा तत्सम बाबी खुंटीवर टांगल्या गेल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आणि पक्षांतराची नवीन लाट उसळली आहे. राज्यातील सत्ताधारी सेना-भाजपमध्ये नगरसेवक आपल्याकडे खेचण्यात प्रचंड चुरस आहे. त्यांच्या स्पर्धेचे मोल साहजिकच पालिकेतील सत्ताधारी मनसेसह काँग्रेस व राष्ट्रवादीला मोजावे लागते.

पळवापळवीच्या सत्रामुळे जेरीस आलेल्या या तिन्ही पक्षांनी सत्ताकाळात लाभाची पदे उपभोगून निवडणुकीच्या तोंडावर उडय़ा मारणाऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न सोडून दिल्यात जमा आहे. त्याऐवजी प्रामाणिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याचा संकल्प संबंधितांनी सोडला आहे. पक्षांतर करणाऱ्यांनी ज्या नव्या पक्षात प्रवेश केला, तिथे तरी किमान प्रामाणिकता जपावी, असा खोचक सल्ला दिला जात आहे. पक्षांतराचा सर्वाधिक फटका मनसेला बसला. या पक्षाच्या २० जणांनी पक्षाला रामराम ठोकला. जिल्हाध्यक्ष, गटनेता अशी पदे भूषविणाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादीचे पाच जण अन्य पक्षात सामील झाले. स्थायी सभापती पदावर विराजमान करूनही या पक्षात काहींना रस राहिला नाही. काँग्रेसचे तीन जण इतरत्र निघून गेले. माकपच्या दोघांनी तोच मार्ग अनुसरला. गेल्या काही महिन्यांत पालिकेतील जवळपास ३० नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे. पुढील काळात कुंपणावर बसलेले आणखी कोण कुठे जाईल याची कोणाला शाश्वती नाही. यामुळे त्यांना थांबविण्याचा वा मनविण्याचा प्रयत्न केला जात नाही. पक्षांतराच्या वादळात प्रामाणिक पदाधिकारी वा कार्यकर्ता सापडणे दुर्मीळ होत आहे.

दुसऱ्या फळीकडून तयारी

नगरसेवकांच्या भरवशावर मनसे चालत नाही. पक्षातील दुसऱ्या फळीने निवडणूकीचे काम सुरू केले आहे. पालिकेतील संख्याबळ कमी झाल्याचे दिसत असले तरी निवडणूकीत ते वाढलेले पहावयास मिळेल. पक्षप्रमुख राज ठाकरे लवकरच नाशिकला येतील. निवडणुकीच्यादृष्टीने मनसेची तयारी सुरू आहे.

राहुल ढिकले  (शहराध्यक्ष, मनसे)

 

निष्ठावंतांवर भिस्त

काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे सद्यस्थितीत काँग्रेसचे कोणी नगरसेवक इतर पक्षात गेलेले नाही. आधी जे गेले ते इतर पक्षातून आलेले होते. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाला काही फरक पडत नाही. निष्ठावान सदस्य व कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष निवडणुकीला सामोरा जाईल.

शरद आहेर (शहराध्यक्ष, काँग्रेस)

 

किमान नव्या पक्षात प्रामाणिक राहावे

अनेक संधी उपभोगून काही जण इतर पक्षात गेले. तिथे तरी त्यांनी प्रामाणिक राहावे. मागील पालिका निवडणुकी वेळी मनसेची हवा होती. त्या पक्षाची सध्या काय स्थिती आहे? सेना-भाजप भविष्यात कायम अशीच स्थिती राहणार नाही. पक्षांतर करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पक्षाने सर्वसामान्यांना खूप संधी दिल्या आहेत. प्रामाणिक कार्यकर्त्यांना या वेळी संधी दिली जाईल.

. जयंत जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)