आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून पहिल्याच दिवशी मिळालेल्या दणक्यानंतर धास्तावलेली महापालिकेची यंत्रणा सुटीच्या दिवशीही अक्षरश: कार्यप्रवण झाली. स्वच्छतेच्या मुद्यावरून मुंढे यांनी कान टोचले होते. यामुळे शनिवारी महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात सर्व विभागांमध्ये युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाललेली ही मोहीम रविवारी सुरू राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रत्येक विभागाला कामाचा साप्ताहिक अहवाल सादर करावा लागणार आहे. आपापल्या कामाचे विशिष्ट पद्धतीनुसार दस्तावेजीकरण करणे, अहवाल कसा तयार करावा या संदर्भात लेखा परिक्षकांनी सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांचा अभ्यास वर्ग घेतला.

महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार शुक्रवारी स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी दुपारी मुख्यालयातील वेगवेगळ्या विभागात जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी अस्ताव्यस्त पडलेले फाईलचे गठ्ठे, कपाटांमध्ये कोंबलेली कागदपत्रे, छतावरील जळमटे, पंखा, टेबल अन् संगणकावर धूळ आदि पहावयास मिळाले. बहुतांश विभागातील कामाचा गलथानपणा उघड झाला. टपालाच्या आवक-जावकची नोंद नसणे, टिपण्णी योग्य पध्दतीने न ठेवणे, कामाच्या सद्यस्थितीची माहिती दर्शविणाऱ्या कागदपत्राचा अभावही समोर आला. या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेत मुंढे यांनी विभाग प्रमुखांना धारेवर धरत दोन दिवसात सर्व नीटनेटके करण्याचे निर्देश दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर, सुटीच्या दिवशी पालिकेतील चित्र बदलले. एरवी कामाच्या दिवशी पालिकेत न रमणारे अधिकारी-कर्मचारी शनिवारी सकाळपासून अवतीर्ण झाले. मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव यांनी सकाळी विभागप्रमुख-कर्मचाऱ्यांना ‘सिक्स बंडल सिस्टीम’विषयी मार्गदर्शन केले. कागदपत्रांची वर्गवारी कशी करावी, दस्तावेज, शासकीय अध्यादेश कसे जतन करावे, नोंदी कशा ठेवाव्यात, अहवाल कसा तयार करावा आदींबद्दल माहिती दिली.

हा अभ्यास वर्ग झाल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोर्चा आपापल्या विभागाकडे वळला. प्रत्येक विभागात स्वच्छतेचे काम सुरू झाले. अस्ताव्यस्त पडलेल्या फाईलच्या गठ्ठय़ांवरील धूळ झटकली गेली. त्यांची वर्गवारी करणे, यासह पंखे, संगणक, टेबलची साफसफाई, भिंतीवरील जळमटे काढत साफसफाई सुरू झाली. बहुतांश विभागातून मोठय़ा प्रमाणात कचरा बाहेर काढण्यात आला. दरम्यान, नागरिकांचा अर्ज, कंत्राटदार अथवा लोकप्रतिनिधींच्या कामांचे प्रस्ताव, फाईल कागदपत्रे यांचा विहित मुदतीत निपटारा करण्यास मुंढे यांनी बजावले आहे. बाह्य़व्यक्तींनी अर्ज वा फाईलींवर नजर ठेवल्यास विभागप्रमुखांना जबाबदार धरून कारवाईचा इशारा दिला आहे. प्रत्येक विभागाला आपला साप्ताहिक अहवाल सादर करावा लागणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेत धास्तावलेले अधिकारी कामाला लागल्याचे चित्र आहे.