27 January 2020

News Flash

मोकाट जनावरांना पकडण्यात अपयश

गेल्या जानेवारीत सिडकोत मोकाट गाईच्या हल्ल्यात सातवर्षीय बालक गंभीर जखमी झाले होते.

नाशिक : शहरातील प्रमुख रस्ते, चौक किंवा इतरत्र मुक्तपणे हुंदडत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि कधीकधी पादचारी, वाहनधारकांवर हल्ला चढविणाऱ्या मोकाट जनावरांचा प्रश्न सोडविण्यात महापालिकेला अपयश आले आहे. सध्या शहरात थोडेथोडके नव्हे तर, तब्बल ७०० ते ८०० मोकाट जनावरे असल्याचा अंदाज आहे.

गेल्या जानेवारीत सिडकोत मोकाट गाईच्या हल्ल्यात सातवर्षीय बालक गंभीर जखमी झाले होते. गाईच्या धडकेत वृद्ध महिला जखमी झाली होती. मोकाट जनावरांच्या तांडवामुळे नागरिक भयग्रस्त असताना पशुवैद्यकीय विभागाने नवरात्र आणि दिवाळीत ५० ते ५५ मोकाट जनावरांना पकडले. त्या जनावरांचे मालक पुढे येत नसल्याने कारवाई करणे अवघड झाले आहे. मोकाट जनावरे पकडण्यासाठी तीन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.

पंचवटी, सिडको, रविवार कारंजा, गंगापूर रोड, नाशिकरोड अशा सर्वच भागांत मोकाट जनावरांचे कळप मुक्तपणे फिरतात. रस्त्यांवर, प्रमुख चौकात ठाण मांडणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. ही जनावरे स्थानिकांसाठी जीवघेणे संकट ठरल्याचे अनेकदा दिसून आले. गेल्या जानेवारीत आईसमवेत शाळेत निघालेल्या महेश पवार या चिमुरडय़ावर गाईच्या कळपाने हल्ला केला होता. हे इतके अकस्मात घडले की, आईच्या डोळ्यासमोर गाई चिमुरडय़ाला पायदळी तुडवत होत्या. हा प्रकार पाहून स्थानिकांनी धाव घेत महेशला सोडविले. हल्ल्यात सातवर्षीय चिमुरडा गंभीर जखमी झाला होता. त्याच काळात सिडकोत ७५ वर्षीय सीताबाई ठाकरे गाईच्या धडकेत जखमी झाल्या होत्या. यापूर्वी मोकाट जनावरांच्या हल्ल्याच्या घटना इतरत्र घडलेल्या आहेत. सर्वत्र मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. मुख्य रस्ते, मध्यवर्ती भागातील वर्दळीचे मुख्य बाजार, भाजी बाजार, असा कोणताही परिसर त्यास अपवाद नाही. मोकाट जनावरे कधी बिथरतील, याचा नेम नसतो. एखादी घटना घडल्यावर काहीतरी केल्याचे दाखवले जाते. पुन्हा तो विषय मागे पडतो, असे चित्र आहे. स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट झालेल्या नाशिकमध्ये शेकडोंच्या संख्येने फिरणारी मोकाट जनावरे हा स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

पालिकेचा पशुसंवर्धन विभाग गाई-गुरांना हाताळणाऱ्या गो शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोकाट जनावरे पकडण्याची कार्यवाही करतो. या कामासाठी एक वाहन आणि चार कर्मचारी असून तक्रार आल्यावर कारवाई केली जाते. म्हणजे सर्वत्र मोकाट जनावरे दृष्टीपथास पडत असताना हा विभाग तक्रार येण्याची प्रतीक्षा करतो. या पथकाने नवरात्र आणि दिवाळीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन मोकाट जनावरे उचलण्याची कार्यवाही केली होती. त्या अंतर्गत ५० ते ५५ जनावरे उचलून ती गोशाळेत नेली गेली. कोंडवाडा व्यवस्थापन नियमावलीनुसार मोकाट जनावर पकडून १० दिवस ठेवावे लागते. या काळात मालक आल्यास दंडात्मक कारवाई करून जनावर दिले जाते. मात्र उचललेल्या जनावरांचे मालक पुढे आले नाही. मालक समोर आल्यावर दंडात्मक वा संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करता आली असती. मात्र उपरोक्त प्रकरणात कोणी मालक समोर आले नसल्याने कारवाईला मर्यादा आल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.

शहरात ७०० ते ८०० मोकाट जनावरे असल्याचा अंदाज आहे. मोकाट गाई, म्हशी, गुरे पकडण्यासाठी सध्या पशुवैद्यकीय विभागाचे दोन आणि गोशाळेचे दोन असे एकूण चार कर्मचारी कार्यरत आहेत. तक्रार आल्यानंतर पथकाकडून कारवाई केली जाते. जनावरे पकडण्याचे काम त्रयस्थ संस्थेला देण्यासाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविली गेली. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याने ती पुन्हा राबविली जाईल. पुढील दीड ते दोन महिन्यांत मोकाट जनावरांना उचलण्याचे काम वेगाने केले जाणार आहे.

– डॉ. प्रमोद सोनवणे (पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका)

डुकरांना मारून विल्हेवाट

मोकाट जनावरांप्रमाणे शहरातील काही भागांत आढळणाऱ्या डुकरांचा त्रास सहन करावा लागतो. काही व्यक्तींचा वराह पालनाचा व्यवसाय आहे. शहरात त्यावर प्रतिबंध आहे. त्यांच्यामार्फत मोकाट सोडली जाणारी डुक्कर मारून त्यांची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही केली जाते. गतवर्षी दीडशे ते दोनशे डुकरांची विल्हेवाट लावली गेली. या वर्षांत आतापर्यंत सुमारे ७० डुक्कर उचलण्याची कार्यवाही केली गेली. डुकरांना मारण्यास सुरुवात केल्यामुळे ज्या भागात ती नेहमी दिसतात, त्या भागात ते कमी झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

First Published on December 4, 2019 3:12 am

Web Title: nashik municipal corporation fail to catch stray animals ltd zws 70
Next Stories
1 राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धा  नाशिक केंद्रातून ‘द लास्ट व्हाईसरॉय’ प्रथम
2 ‘फास्टॅग’ सक्तीला काँग्रेसचा विरोध
3 महापौरपदाच्या फसलेल्या प्रयोगावर अळीमिळी गुपचिळी!
Just Now!
X