05 April 2020

News Flash

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा नागरी सत्कार

महापालिकेतर्फे सन्मानार्थ तीन लाख रुपये, चांदीची गदा दिली जाणार आहे.

महापालिका तीन लाख रुपये देणार

नाशिक : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कुस्तीतील महाराष्ट्र केसरीची गदा हर्षवर्धन सदगीरच्या रुपाने नाशिकमध्ये प्रथमच आली. भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेचे पहिलवान हर्षवर्धन यांना महापालिकेने सदिच्छादूत करण्यास याआधीच मान्यता दिली असून महापालिका नाशिककरांच्यावतीने २८ जानेवारी रोजी हर्षवर्धन यांचा नागरी सत्कार करणार आहे. महापालिकेतर्फे सन्मानार्थ तीन लाख रुपये, चांदीची गदा दिली जाणार आहे.

महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन यांनी बाजी मारली. हर्षवर्धन हे मूळचे अकोला तालुक्यातील असले तरी वयाच्या ११ व्या वर्षांपासून ते भगूरच्या नरसिंगराव बलकवडे व्यायामशाळेत कुस्तीचे धडे गिरवित आहेत. हर्षवर्धन यांची महापालिकेचा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती आणि त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीने मान्यता दिली होती.

नागरी सत्कारासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिकेने स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. त्या अनुषंगाने ऑलिम्पिकच्या तयारीसाठी हर्षवर्धनला ११ लाखाचा निधी द्यावा, अशी मागणी खैरे यांनी केली. काही नगरसेवकांनी हर्षवर्धन यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्याची तर काहींनी चांदीची गदा देण्याची सूचना केली. महापालिकेच्या नियमानुसार तीन लाखापर्यंतचा आर्थिक निधी देता येतो. हर्षवर्धन यांना सन्मानार्थ तीन लाख रुपये, चांदीची गदा दिली जाणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. महापालिकेचा सदिच्छादूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नागरी सत्कारात सोहळयात नाशिककरांना सहभागी केले जाणार आहे. शहरातील तालीम, क्रीडा संघटना, खेळाडू असे सर्व या कार्यक्रमात सहभागी होतील, असे खैरे यांनी सांगितले. काही सदस्यांनी मैदानावर सोहळा आयोजित करण्याची मागणी केली. महाकवी कालिदास कलामंदिरात हा सोहळा आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब झाले. कार्यक्रमास पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रित करण्याची सूचना करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2020 1:47 am

Web Title: nashik municipal corporation honored maharashtra kesari harshvardhan sadgir zws 70
Next Stories
1 तपोवन एक्स्प्रेसमध्ये भ्रमणध्वनी चोरी करणाऱ्या टोळीला अटक
2 ‘माऊली’च्या गजराने त्र्यंबक नगरी निनादली
3  ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमामुळे जन्मदराचा टक्का वाढला
Just Now!
X