07 July 2020

News Flash

रस्त्यांच्या कामांसाठी कर्जरोखे

मनपा ऑनलाइन सभेत अंदाजपत्रकास मंजुरी

महापालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत सहभागी झालेले महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे आणि इतर (छाया-यतीश भानू)

शहराच्या विकास आराखडय़ातील रखडलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी कर्ज रोखे काढण्यासह रोजगारासाठी आयटी पार्कची उभारणी, बहुमजली वाहनतळासाठी तरतूद यासह सदस्यांच्या सूचना, उपसूचनांचा अंतर्भाव करत स्थायी समितीने सादर केलेल्या महापालिकेच्या २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात ऑनलाईन सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. दृकश्राव्य पध्दतीने ऑनलाइन झालेल्या या सभेत मध्येच आवाज जाणे, बोलता न येणे अशा काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या. परंतु, राज्यात प्रथमच ऑनलाइन पध्दतीने झालेला सभेचा प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा महापौरांनी केला आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली नसल्याने अनेक कामे रखडल्याचे कारण देऊन भाजप टाळेबंदीत सभेसाठी आग्रही होता. महाकवी कालिदास कला मंदिरात गर्दी होईल यामुळे सभा घेता आली नाही. नंतर ऑनलाइन दृकश्राव्य सभेची संकल्पना मांडली गेली. शुक्रवारी काही अडचणी येऊनही ती प्रत्यक्षात आली. प्रारंभी स्थायी सभापती गणेश गिते यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे, सभागृह नेते सतीश सोनवणे उपस्थित होते. अंदाजपत्रकावरील चर्चा बराच काळ चालली. करोनाच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय-आरोग्य विभागासाठी तरतूद करावी, महापालिकेत समाविष्ट झालेल्या खेडय़ांना जादा निधी मिळावा आदी मागण्या सदस्यांनी मांडल्या. या वर्षांत आजपर्यंत न झालेल्या विकास आराखडय़ातील रस्त्यांसाठी कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आवश्यक त्या ठिकाणी भाजी बाजाराची उभारणी, बहुमजली वाहनतळासाठी तरतूद, पर्यटन मदत केंद्राची उभारणी, रोजगारासाठी आयटी पार्क आदींची घोषणा महापौरांनी केली. करोना काळात शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले जाईल. डेंग्यू, मलेरियासह अन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना, मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरी स्वच्छतेसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाणार आहे. शहरातील नाल्यांचे पाणी नदीत जाणार नाही यासाठी जलवाहिनी टाकली जाईल, असेही ते म्हणाले.

ऑनलाइन सभा यशस्वी झाल्याचा दावा महापौरांनी केला. शहराच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाशी पाणी करारासह अन्य विषय तहकूब राहिले. जल करारासाठी आठ दिवसात पुन्हा सर्वसाधारण सभा घेतली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

कधी आवाज बंद, कधी चित्र दिसेनासे

एरवी सभागृहात सभेसाठी एकत्रित जमणारे काही नगरसेवक घर वा कार्यालयातून तर विरोधी पक्षनेते, गटनेते पालिकेतील आपापल्या कार्यालयातून सभेत सहभागी झाले. तिथे त्यांच्या पक्षांचे काही नगरसेवकही उपस्थित होते. महापौर, आयुक्त आणि नगरसचिव यांनी आयुक्तांच्या दालनाशेजारील सभागृहातून एलईडी पडद्यावर सभेचे संचलन केले. सभेदरम्यान अनेक गंमतीजमती पहायला मिळाल्या. काही नगरसेवक भ्रमणध्वनीद्वारे पालिका मुख्यालय परिसरातून सभेत सहभागी झाले. सभागृहात सदस्य जसे हात वर करून बोलण्यासाठी परवानगी मागतात, त्याच प्रकारे ऑनलाइन सहभागी झालेले नगरसेवक हात वर करून बोलण्यासाठी परवानगी मागू शकतील, सभेचे कामकाज प्रत्येकाला ऐकू येईल अशी व्यवस्था होती. परंतु, मध्येच आवाज जाणे, इंटरनेट संथ होणे, पडद्यावरील चित्र गायब होणे, अशा तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले. यामुळे काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 3:01 am

Web Title: nashik municipal corporation loans for road works abn 97
Next Stories
1 Coronavirus : शहरात करोनाचा वाढता प्रसार
2 मालेगावमध्ये दोन दिवसांत करोनाचे नवीन ३२ रुग्ण
3 एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला
Just Now!
X