News Flash

सत्ताधाऱ्यांकडून पालिका अधिकारी फैलावर

अतिवृष्टीत सराफ बाजारासह कापड बाजार व शहरातील अनेक भागातील दुकाने व घरांचे मोठे नुकसान झाले.

सराफ बाजारात व्यावसायिकांशी चर्चा करताना महापौर रंजना भानसी.  समवेत दिनकर पाटील व इतर.

बुधवारच्या पावसाने शहरात हाहाकार उडविल्याने निर्माण झालेल्या स्थितीच्या पाश्र्वभूमीवर, सत्ताधारी भाजपने गुरूवारी तातडीची बैठक बोलावत पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पावसाळी गटार योजनेची उपयोगिता काय, प्लास्टिक कचऱ्याचे न होणारे संकलन आदी मुद्यांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत पुन्हा असा पाऊस कोसळल्यास या स्थितीला तोंड द्यावे लागू नये म्हणून उपाय करण्याचे निर्देश दिले. या बैठकीनंतर महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील आदींनी व्यापारी पेठांमधील स्थितीची पाहणी केली.

अतिवृष्टीत सराफ बाजारासह कापड बाजार व शहरातील अनेक भागातील दुकाने व घरांचे मोठे नुकसान झाले. या पाश्र्वभूमीवर, महापालिकेत बैठक बोलावत महापौरांनी एकंदर स्थितीचा आढावा घेतला. तासाभरात ९२ मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे सर्व बाजुने सराफ बाजारात पाण्याचा लोंढा आला. सरस्वती नाल्यातून पावसाचे पाणी वाहून गोदावरीत नेले जाते. या बंदीस्त नाल्यात कचरा अडकू नये म्हणून जाळ्या लावण्यात आल्या आहेत. परंतु, पावसाच्या पाण्यात प्लास्टिक व इतर कचरा या जाळ्यांवर अडकून पडल्याने पाणी वाहून नेण्यात अडथळे आल्याचे शहर अभियंता यु. बी. पवार यांनी नमूद केले. रात्री १५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने या परिसरात नाले सफाईसह इतर कामे हाती घेण्यात आले. नाल्यांच्या क्षमतेच्या दुप्पट पाणी आले होते.

इतर भागातही ज्या ठिकाणी प्लास्टिक कचरा अडकून पडला, तिथे अशीच स्थिती निर्माण झाली. नाशिकला प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्लास्टिक कचरा संकलित होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत दिनकर पाटील यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

वादग्रस्त ठरलेली पावसाळी गटार योजना पाणी वाहून नेण्यास असमर्थ ठरली. त्यामुळे अनेक भागात पावसाचे पाणी तुंबले. या योजनेची उपयुक्तता काय, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी शहर अभियंत्यांनी अतिवृष्टीचा संदर्भ देत ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले नाही, तिथे तिचा उपयोग झाल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्व भागात या योजनेंतर्गत काम झालेले नाही. एक तासात २७. ५ मिलीमीटर पाऊस गृहीत धरून पावसाळी गटार योजना साकारण्यात आली आहे. फारतर तासाभरात ३५ मिलीमीटर पाऊस झाल्यास ती तग धरू शकते. त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्यास कोणतीही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत राहू शकणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले.

पावसाळी गटार योजनेचे समर्थन पाटील यांना काही पटले नाही. त्यांनी ही योजना राबविणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्यांचा आजही बचाव केला जात असल्याचा आरोप केला. गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी नाले सफाईच्या कामातील त्रुटींवर बोट ठेवले. भुयारी गटार योजनेची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध नसतात. या सर्व अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नागरिकांसाठी जाहीर करावेत, अशी सूचना महापौर भानसी यांनी केली. ३१ प्रभागात प्रभागनिहाय नाले सफाईचे काम देण्यात आले आहे. यामुळे पावसाळ्यातील चार महिने प्रभागनिहाय मनुष्यबळ उपलब्ध राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 2:07 am

Web Title: nashik municipal corporation officer ruling party in nashik
Next Stories
1 सराफ बाजारात दुसऱ्या दिवशीही तळघरांमध्ये पाणी कायम
2 औक्षण करून, गुलाब पुष्प देऊन शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा!
3 मतदार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडून हमीपत्र
Just Now!
X