अडवणुकीचे पडसाद; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर स्थायीच्या बैठकीत सभापतींचे निर्देश

महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात बंदूकधारी सुरक्षारक्षकांकडून केल्या जाणाऱ्या अडवणुकीचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. सुरक्षारक्षकांच्या कार्यशैलीविषयी वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन स्थायी सभापतींनी प्रवेशद्वारावरील संबंधित सुरक्षारक्षकांची संख्या कमी करून करारनाम्याचे पालन करण्याचे निर्देश दिले.

काही महिन्यांपूर्वी अपंग बांधवांच्या आंदोलनावेळी चर्चेदरम्यान आ. बच्चू कडू पालिका आयुक्तांच्या अंगावर धावून गेले होते. महापालिकेत यापूर्वी राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याची उदाहरणे आहेत. या पाश्र्वभूमीवर, मुख्यालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. तथापि, मुख्यालयाची धुरा बंदूकधारी सुरक्षारक्षकांकडे सोपविल्यानंतर नव्या आणि जुन्या सुरक्षारक्षकांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले असून त्याची परिणती वेगवेगळ्या अफवांना उधाण येण्यात झाली. मुख्यालयात प्रवेश करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांना पालिकेचे ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले. नागरिकांनाही ओळखपत्र दाखविल्याशिवाय प्रवेश मिळणार नसल्याची अफवा पसरविली गेली. तथापि, सुरक्षा विभागाने त्यात तथ्य नसून महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना ओळखपत्र दाखविणे बंधनकारक नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

या स्थितीत सुरक्षारक्षकांनी काही नगरसेवक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची अडवणूक केली आणि हा विषय थेट स्थायी समितीच्या बैठकीत पोहोचला. सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सुरक्षारक्षकांच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. सुरक्षारक्षक नगरसेवकांची अडवणूक करतात. नागरिकांना वेगवेगळ्या प्रवेशद्वारांवरून जाण्यास सांगितले जाते. काहींकडे ओळखपत्राची मागणी झाल्याची तक्रार या वेळी करण्यात आली.

महापालिकेवर असे कोणते संकट कोसळले की, इतक्या मोठय़ा संख्येने बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात करावे लागले, असा प्रश्न बंटी तिदमे यांनी उपस्थित केला. संबंधितांमुळे पालिकेला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुकेश शहाणे यांनी या व्यवस्थेवर ताशेरे ओढले. याद्वारे पालिकेमध्ये संचारबंदी लागू केली गेल्याचा आरोप डी. जी. सूर्यवंशी यांनी केला. सुरक्षारक्षकांच्या कार्यशैलीवरील आक्षेप लक्षात घेऊन सभापतींनी मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले. सुरक्षारक्षक तैनात करण्याबाबत महापालिका आणि संबंधित संस्थेत करारनामा झाला आहे. त्या करारनाम्याचे पालन करण्याची सूचना त्यांनी केली. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, सुरक्षा विभागाचे प्रमुख उपायुक्त एच. डी. फडोळ यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर धाव घेऊन सुरक्षारक्षकांना सूचना दिल्या. नव्या सुरक्षारक्षकांसोबत काही जुने सुरक्षारक्षक मदतीला ठेवण्यात आले आहेत. नवीन सुरक्षारक्षकांना नगरसेवक, अधिकारी यांच्याबाबत फारशी माहिती नाही. संबंधितांची अडवणूक करू नये असे त्यांना सूचित करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांकडून ओळखपत्र, तत्सम बाबींची मागणी करू नये असेही सांगण्यात आले आहे. अधिकारी वगळता कर्मचारी आणि नागरिकांनी मुख्य प्रवेशद्वारातून महापालिकेत प्रवेश करावा, असे अपेक्षित आहे. यामुळे इतर प्रवेशद्वारातून येणाऱ्या नागरिकांना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यास सांगण्यात आले. करारनाम्याप्रमाणे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याचे सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, भाजपच्या नगरसेविकेने ओळखपत्र मागण्यात काय गैर आहे, असा प्रश्न करत सुरक्षारक्षकांचे समर्थन केले.

वादाचे कारण वेगळेच

नव्याने दाखल झालेले हे सुरक्षारक्षक नगरसेवक-अधिकाऱ्यांबाबत अनभिज्ञ आहेत. संबंधितांकडून प्रवेशद्वारावर काही नगरसेवकांची चौकशी केली गेली होती. नवीन सुरक्षारक्षक तैनात झाल्यामुळे जुन्या सुरक्षारक्षकांना पालिकेच्या इतर प्रकल्पांत बदलीवर जावे लागणार आहे. या घडामोडींमुळे नवे आणि जुने सुरक्षारक्षक यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. सुरक्षा विभागाने मुख्यालयात प्रवेश करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांना ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केले. ही माहिती काही घटकांकडून नागरिकांशी जोडून अफवा पसरविली. सर्वसामान्यांना महापालिकेत प्रवेश करण्यासाठी ओळखपत्राची गरज नसल्याचे स्पष्टीकरण सुरक्षा विभागाचे प्रमुख उपायुक्त एच. डी. फडोळ यांनी आधीच दिले आहे. ओळखपत्राचा निकष केवळ पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आहे. नागरिकांना ओळखपत्र बाळगण्याची गरज नाही. प्रवेश करताना त्यांना केवळ कोणत्या विभागात जायचे आहे याची नोंद करावी लागणार आहे.