पदासाठी ऐनवेळी आलेल्या नावामुळे इच्छुक नाराज; विरोधकही मैदानात
महापालिकेची आर्थिक तिजोरी मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवारीवरून भाजपमधील अस्वस्थता पुन्हा एकदा उफाळून आली. सभापतिपदासाठी पक्षाने अनेक इच्छुकांकडून अर्ज भरून घेतले. ऐनवेळी हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित करत केवळ त्यांचा अर्ज सादर करण्यात आला. या घडामोडीमुळे इतर इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. काहींनी महापौर बंगल्यात शहराध्यक्षांना खडेबोल सुनावल्याचे सांगितले जाते.
भाजपमधील अंतर्गत सुंदोपसुंदीचा काही लाभ उठविता येईल काय याची, चाचपणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. सभापतिपदासाठी १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ मार्च होती. स्थायी समितीत भाजपचे नऊ, तर शिवसेनेचे चार, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होती. दिनकर पाटील, उद्धव निमसे, हिमगौरी आडके-आहेर आदींमध्ये स्पर्धा होती. भाजपने सात महिलांना स्थायीवर सदस्यत्व दिले आहे. महापालिकेच्या इतिहासात या पदावर महिलेला संधी मिळालेली नाही. यामुळे महिलेला संधी दिली जाईल या अपेक्षेने इतर सदस्यांनी मोर्चेबांधणी केली. सर्व इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. वरिष्ठ जे नाव निश्चित करतील, त्याचा अर्ज सादर केला जाईल असे सांगण्यात आले.
भाजप शहराध्यक्षांना पंचवटीतील इच्छुकाच्या रोषाला सामोरे जावे लागले. संबंधिताने खडेबोल सुनावल्याचे सांगितले जाते. इतर महिला इच्छुक पक्षाच्या निर्णयाने नाराज झाल्या. दिनकर पाटील यांनी नातेवाईकाचे निधन झाल्याचे कारण देऊन निघून जाणे पसंत केले.
आधी तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या इच्छुकांनी नंतर मवाळ भूमिका स्वीकारली. पक्षाचा आदेश मान्य असल्याचे नमूद केले. संभाजी मोरुस्कर यांनी उमेदवार निश्चित करताना कोणताही वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात भाजप शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. स्थायीत भाजपचे बहुमत असले तरी विरोधकांची मोट बांधून शिवसेनाही मैदानात उतरली आहे. सेनेच्या संगीता जाधव यांनी सभापतिपदासाठी अर्ज केला.
‘..मग अर्जच का भरून घेतले’
स्थायी समिती सभापतिपदासाठी इच्छुकांची अर्ज भरून घेण्यात आले होते. यातील अंतिम नाव महापौर बंगल्यात वरिष्ठांकडून निश्चित होणार होते. परंतु ऐनवेळी हिमगौरी आहेर-आडके यांचा अर्ज नगरसचिवांकडे सादर करण्यात आल्याने काही इच्छुकांनी संताप व्यक्त केल्याचे बोलले जाते. आहेर-आडके यांचा अर्ज आल्यामुळे इतरांचे अर्ज सादर केले गेले नाहीत. उमेदवाराचे नाव आधीच निश्चित असताना इतरांकडून अर्ज भरण्याचे सोपस्कार का पार पाडले गेले, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. या घडामोडींबाबत इच्छुकांशी संपर्क साधला असता त्यांनी कानावर हात ठेवले. आम्ही असेपर्यंत असे काही घडले नाही. परंतु इच्छुकांकडून आधी अर्ज भरून घेतल्याचे मान्य केले. असे अर्ज का भरून घेतले त्याची माहिती भाजप शहराध्यक्षांना विचारावी, असा सल्ला त्यांनी दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 2:25 am