पश्चिममध्ये शिवाजी गांगुर्डे, पूर्वमध्ये नीलिमा आमले, पंचवटीत कुंभारकर यशस्वी
फुटीरांची कोंडी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बजावलेल्या व्हिपचा प्रभाव उर्वरित तीन प्रभाग समितींच्या निवडणुकीतही पहावयास मिळाला. पश्चिम प्रभागात काँग्रेसमधील अंतर्गत घोळामुळे या पक्षाचेच दोन उमेदवार परस्परांविरोधात लढले. पक्षाचे तीन आमदार याच भागातील नगरसेवक असूनही या प्रभागात भाजपने एकंदर समिकरण लक्षात घेऊन शांत बसणे पसंत केले. पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे हे विजयी झाले. तर, पूर्वमध्ये राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले तर पंचवटी प्रभाग सभापतीपदी मनसेचे रुची कुंभारकर यांची अविरोध निवड झाली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षांतर करणाऱ्यांना चाप लावण्यात व्हिपने महत्वाची भूमिका बजावल्याचे अधोरेखीत झाले.
आदल्या दिवशी सातपूर, सिडको व नाशिकरोड प्रभाग सभापतींची निवड अविरोध पार पडली होती. गेल्या काही दिवसात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडय़ा मारणाऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले. त्याचा फटका सत्ताधारी महाआघाडीला बसणार असल्याची धास्ती व्यक्त केली जात होती. परंतु, फुटीरांना धडा शिकविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी व्हिप बजावत अधिकृत उमेदवारास मतदान न केल्यास कारवाईचे संकेत दिले. यामुळे पक्षांतर करणाऱ्यांची अडचण झाली होती. दुसऱ्या दिवशीही यापेक्षा वेगळे काही घडले नाही. आपल्या पक्षात प्रवेश देणाऱ्या शिवसेना व भाजपला केवळ या घडामोडी पाहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पश्चिम प्रभागातील जागा महाआघाडीने काँग्रेससाठी सोडली होती. या ठिकाणी पक्षाने गांगुर्डे यांचे नाव निश्चित केले. या पक्षाच्या योगिता आहेर यांनी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्यासाठी आहेर आल्याच नाहीत. मनसेतून भाजपमध्ये आलेल्या सुनिता मोटकरी यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे ही निवडणूक काँग्रेसचे गांगुर्डे आणि आहेर यांच्यात झाली. माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी भाजपच्या असहकार्याच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार टाकला. आ. सीमा हिरे आणि डॉ. राहुल आहेर यांनी सभागृहातील वातावरण पाहून निघून जाणे पसंत केले. मतदानात गांगुर्डे हे पाच मतांनी निवडून आले. तर काँग्रेसच्या आहेर यांना शुन्य मते मिळाली.
नाशिक पूर्व प्रभागात अपक्ष शेख रशिदा शेख, मनसेच्या सुमन ओहोळ, मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या डॉ. दीपाली कुलकर्णी, राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले, रंजना पवार, काँग्रेसच्या समिना मेमन यांनी अर्ज दाखल केले होते. महाआघाडीने ही जागा राष्ट्रवादीला दिली होती. त्यामुळे मनसे व काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. इतरांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे सभापतीपदी आमले यांची अविरोध निवड झाली. याची पुनरावृत्ती पंचवटी प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत झाली. या ठिकाणी भाजपचे परशराम वाघेरे, अपक्ष दामोदर मानकर, मनसेचे रुची कुंभारकर, काँग्रेसच्या विमल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या ठिकाणी कुंभारकर वगळता सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे कुंभारकर यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत महाआघाडीने व्हिप बजावत फुटीरांची कोंडी केली. पक्षात प्रवेश दिलेल्या नगरसेवकांच्या सहकार्याने प्रभाग सभापतीपद काबीज करण्याचे भाजप व शिवसेनेचे प्रयत्न दिवास्वप्न ठरले.