तब्बल १३९ वर्षांनंतर कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात पूर्वसंध्येपासून टँकर रिते होण्यास सुरुवात झाल्यामुळे नववर्षांच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या कुंडात बऱ्याच महिन्यांनंतर प्रथमच काहीसे स्वच्छ पाणी पाहावयास मिळाले. महापौर अशोक मुर्तडक यांनी केलेल्या आवाहनास शहरातील टँकरमालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे भाविकांना सहन करावा लागणारा त्रास कमी झाला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील प्रमुख पर्वण्यांवेळी भरभरून वाहणारे गोदापात्र दुष्काळामुळे जवळपास कोरडेठाक झाले. सिंहस्थात सोडलेल्या पाण्यामुळे उच्च न्यायालयाने ताशेरे मारून पुन्हा पाणी सोडण्यास प्रतिबंध केला. त्यातच, गंगापूर धरणामधून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यामुळे यंदा शेतीसह नाशिकमध्ये पाणीकपात करावी लागली. या एकंदर स्थितीत गंगापूर धरणापासूनचे गोदापात्र काही अपवाद वगळता पूर्णत: शुष्क झाले आहे. त्याचा त्रास अस्थी विसर्जनासाठी रामकुंडावर येणाऱ्या भाविकांना सहन करावा लागत होता. रामकुंडाची अवस्था साचलेल्या पाण्याच्या डबक्याप्रमाणे झाली. या ठिकाणी पूजाविधीसाठी दररोज शेकडो भाविक येतात. विधिवत पूजन करून या कुंडात स्नानही केले जाते.
मात्र रामकुंडासह गोदावरीच्या सध्याच्या स्थितीमुळे परिसरात कमालीची दरुगधी आहे. या ठिकाणी काही काळ उभे राहणे अवघड ठरते. या स्थितीत पूजन व अस्थी विसर्जन करणे जिकिरीचे ठरत असल्यामुळे भाविकांमध्ये कमालीची नाराजी होती. पात्रातील प्रदूषण व दरुगधीविषयी ओरड होऊ लागल्यानंतर महापालिकेने रामकुंडात पाणी आणण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू केला. तोपर्यंत रामकुंडातील पाणी संपुष्टात आल्याने स्थिती अधिकच गंभीर झाली.
१८७७ मध्ये रामकुंड या पद्धतीने कोरडे झाले होते. दुष्काळामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर त्याची पुनरावृत्ती झाल्याचे लक्षात घेऊन महापौर अशोक मुर्तडक यांनी सामाजिक दायित्वातून टँकरमालकांनी विहिरी वा कूपनलिकेतून पाणी रामकुंडात टाकण्याचे आवाहन केले होते. त्यास संबंधितांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. गुरुवारी रात्रीपासून टँकरमधून पाणी रामकुंडात टाकण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी दुपापर्यंत जवळपास २५ ते ३० टँँकरद्वारे पाणी कुंडात सोडण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या काही वर्षांच्या इतिहासात दुष्काळी स्थितीतही रामकुंडात या पद्धतीने पाणी टाकण्याची वेळ आली नव्हती. नगर, एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आदींसाठी धरणातून अधूनमधून पाणी सोडले जाते. यामुळे गोदापात्र प्रवाही राहत असल्याने रामकुंडात कधी बाहेरून पाणी आणण्याची वेळ आली नव्हती.
तथापि, यंदा दुष्काळाची झळ या परिसरास आणि पर्यायाने भाविकांनाही बसली. टँकरद्वारे रामकुंडात पाणी उपलब्ध झाल्यामुळे काही दिवसांसाठी का होईना हा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मार्गी लागल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.