मंडप हटवत महापालिकेची १६० जणांना नोटीस

बांधकाम व्यावसायिकाने रातोरात भाजी बाजार उद्ध्वस्त केल्यामुळे आकाशवाणी केंद्रासमोर विक्रेत्यांनी चालविलेले आमरण उपोषण सोमवारी महापालिकेने बेकायदेशीर ठरवत मोडून काढण्याचा प्रयत्न केला. आकाशवाणी केंद्रासमोर विक्रेत्यांनी आंदोलनासाठी टाकलेला मंडप हटविण्यात आला. विक्रेत्यांनी त्याची पर्वा न करता मोकळ्या जागेत उन्हात उपोषण कायम ठेवले. उपरोक्त जागेवर बांधकाम व्यावसायिक भाजी मंडईचे बांधकाम करून देणार असून त्यासाठी विक्रेत्यांनी पर्यायी जागेत तात्पुरते स्थलांतर करावे याकरिता पालिकेने प्रयत्न केले. त्यास प्रतिसाद न देता विक्रेत्यांनी उपोषण सुरू ठेवले. सभा मंडप हटवत पर्यायी जागेत स्थलांतर न केल्यास १६० विक्रेत्यांची फेरीवाला नोंदणी रद्द करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.

आकाशवाणी केंद्रासमोरील उद्ध्वस्त भाजी बाजाराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. बांधकाम व्यावसायिकाने भाजी बाजार उद्ध्वस्त केल्यानंतर विक्रेत्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास नागरिकांनी पाठिंबा दिला. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा आणि भाजी बाजार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. या काळात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बांधकाम व्यावसायिकाने परवानगीसाठी प्रकरण सादर केले आहे. त्यांच्या जागेपैकी काही जागा ही समावेशक आरक्षणांतर्गत ठक्कर डेव्हलपर्स हे महापालिकेला विकसित करून देणार आहेत. ते विकसित करून दिल्याशिवाय त्यांना उर्वरित जागेत बांधकाम परवानगी देण्यात येणार नाही. भाजी बाजाराची जागा विकसित करून त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत पथ विक्रेत्यांना जागा नेमून दिली जाईल, असे स्पष्ट करीत महापालिकेने विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध केलेल्या जागेत स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. वारंवार वास्तव स्थिती समजावूनही विक्रेते आंदोलनावर ठाम राहिले. सोमवारी पालिकेने विक्रेत्यांचे आंदोलन ज्या ठिकाणी सुरू होते, तेथील मंडप आणि तत्सम सामग्री हटविण्याची कारवाई केली. विना परवानगी हे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्या अवास्तव असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख आर. एम. बहिरम यांनी सांगितले. दुसरीकडे महापालिका दडपशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरडत असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. या संदर्भात महापालिकेने आकाशवाणी केंद्राजवळील फेरीवाला क्षेत्राबाबत १६० विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे. भाजी मंडइचे काम पूर्ण होईपर्यंत विक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करावे. त्यासाठी आकाशवाणी केंद्राजवळ आणि होरायझन शाळेलगतची जागा तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध केली आहे. वारंवार सूचना देऊनही विक्रेते स्थलांतरित झाले नाही. उलट भाजी बाजाराच्या मूळ जागेतील विकासाचे काम आंदोलनाद्वारे बंद पाडले. ही नोटीस मिळाल्यानंतर तात्काळ आकाशवाणी केंद्राची भिंत आणि होरायझन शाळेलगतच्या रस्त्यावर स्थलांतरित न झाल्यास विक्रेत्यांची फेरीवाला नोंदणी रद्द करून कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

रहिवाशांची गैरसोय

महापालिका, बांधकाम व्यावसायिक आणि विक्रेते यांच्या वादात गंगापूर रोड, कॉलेजरोड आसपासच्या भागातील रहिवाशांना भाजीपाला मिळणे अवघड झाले आहे. महापालिकेने पर्यायी जागा देऊनही विक्रेते त्या ठिकाणी स्थलांतर करीत नाही. परिणामी, रहिवाश्यांना भाजीपाला मिळण्यासाठी थेट रविवार कारंजा, पंचवटी कारंजा भागात जावे लागते. गंगापूर रस्त्यावर अशोक स्तंभ ते आनंदवली या सहा किलोमीटरच्या मार्गावर कुठेही पालिकेचा अधिकृत भाजी बाजार नाही. आकाशवाणी केंद्राजवळील भाजी बाजारावर सर्वाची भिस्त असते. तो सात दिवसांपासून बंद असल्याने स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहे.