08 March 2021

News Flash

महापौरपदासाठी निष्ठावान-आयारामांमध्ये चुरस

महापालिकेवर एकहाती सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजपमध्ये महापौरपदासाठी दावेदारांची संख्या आहे,

 

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात पक्षाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत नाव निश्चिती

महापालिकेवर एकहाती सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजपमध्ये महापौरपदासाठी दावेदारांची संख्या आहे, इन मीन पाच. त्यात पक्षाचे तीन जुने निष्ठावान तर उर्वरित दोन दावेदार निवडणुकीआधी पक्षात प्रवेश झालेले. नवे-जुने एकत्र करून महापौरपदासाठी नाव निश्चित होईल, असे खुद्द शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी जाहीर केल्यामुळे निष्ठावान आणि आयाराम यांच्यात पुन्हा तीव्र चुरस होणार आहे. या स्थितीत महापौरपदी विराजमान होण्याची संधी कोणाला मिळणार, याचा निर्णय चार किंवा पाच मार्चला पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत होईल.

महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वाचे लक्ष आहे ते महापौरपदाच्या निवडीकडे. या निवडणुकीत प्रथमच प्रदीर्घ काळानंतर एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. सत्ता स्थापनेसाठी भाजपला कोणाचीही गरज नाही. दुसरीकडे नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौरपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यात महिला व पुरुष यापैकी कोणालाही संधी मिळू शकते. याकरिता भाजपमध्ये दावेदारांची संख्या केवळ पाच असली तरी या निवडीत पक्षात जुने-नवे अर्थात निष्ठावान आणि आयाराम असा पुन्हा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत. प्रभाग क्रमांक एकमधून विजयी झालेल्या रंजना भानसी, प्रभाग क्रमांक दोनमधील सुरेश खेताडे, प्रभाग क्रमांक चारमधील सरिता सोनवणे, प्रभाग सहामधील पुंडलिक खोडे आणि प्रभाग २३ मधील रुपाली निकुळे यातील एका नावाची निश्चिती पक्षाला करावी लागणार आहे.

भानसी या सर्वात ज्येष्ठ नगरसेविका. सलग पाचव्यांदा त्या निवडून आल्या आहेत. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या भानसी यांच्याकडे प्रभाग सभापती आणि स्थायी समिती, महिला बालकल्याण समितीवर सदस्य म्हणून केलेल्या कामाचा अनुभव आहे. भानसी यांच्याप्रमाणे खोडे हेदेखील भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. दहावीनंतर आयटीआय डिप्लोमा शिक्षण घेणारे खोडे हे आधी नगरसेवकही राहिले आहेत. शिक्षण मंडळ, स्थायी समिती आणि वृक्ष प्राधिकरण समितीवर त्यांनी काम केले. पालिकेच्या कामकाजाचा दोघांकडे अनुभव आहे.

दावेदारांच्या यादीत उच्चशिक्षित म्हणून सरिता सोनवणे यांच्याकडे पाहिले जाते. एम.ए. बी.एड्.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सोनवणे एचपीटी महाविद्यालयात हिंदी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. नंतर त्यांनी भाजपचे काम सुरू केले. पक्षाच्या शहर चिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. हे तीनही दावेदार पक्षाच्या निष्ठावंतांच्या यादीत असले तरी उर्वरित दोन मात्र निवडणुकीआधी भाजपमध्ये दाखल झालेले आहेत.

त्यातील खेताडे यांच्याकडे पालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे. यापूर्वी दोन वेळा ते नगरसेवक होते. राष्ट्रवादीचा गटनेता म्हणूनही त्यांनी काम पाहिले. दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. ज्येष्ठ दावेदारांच्या यादीत रुपाली निकुळे तरुण चेहरा आहे. वाणिज्य शाखेच्या पदवीच्या पहिल्या वर्षांपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. या पाच जणांमधून महापौरपदासाठी नाव निश्चित करताना पक्ष निष्ठावंत आणि बाहेरून आलेले यामध्ये कोणाला प्राधान्य देणार याबद्दल सर्वच नगरसेवकांमध्ये उत्सुकता आहे. तिकीट वाटपावेळी असाच वाद उफाळून आला होता. भाजप निष्ठावंतांना झुकते माफ देणार की पुन्हा त्याची पुनरावृत्ती होणार याकडे सर्वाचे लक्ष आहे. पालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांची नावे राजपत्रात अद्याप प्रसिद्ध झालेली नाहीत. चार किंवा पाच मार्च रोजी कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्या वेळी महापौर पदाचे नाव निश्चित होणार असल्याचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी सांगितले.

नवे-जुने असे सर्व एकत्र करून महापौर पदासाठी नाव निश्चित केले जाईल. पक्षाच्या सर्व नगरसेवकांशी चर्चा केली जाईल. अंतिम निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत होईल.

– आ. बाळासाहेब सानप (शहराध्यक्ष, भाजप)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 4:34 am

Web Title: nashik municipal election results 2017 nashik bjp mayor nashik mayor
Next Stories
1 महामार्गातील अडथळा उद्ध्वस्त
2 कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडे लोकप्रतिनिधी व साहित्यप्रेमींची पाठ
3 भाजपसह माकप, सेनेला आत्मचिंतनाची गरज
Just Now!
X