हजारो स्पर्धकांचा सहभाग.. लाखो रुपयांची बक्षिसे.. संगतीला संस्थेचा सांस्कृतिक धडाका अशा उत्साही वातावरणात येथील राष्ट्रीय ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन’चा तिसरा आणि राज्यस्तरीय धावण्याच्या शर्यतीचा आठवा अध्याय संपला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने आयोजित अशा प्रकारची ही जिल्ह्य़ातील एकमेव स्पर्धा असल्याने नाशिककरांसाठी तिचे महत्त्व निश्चितच अधिक. त्यामुळेच ही स्पर्धा प्रत्येक वर्षी अधिकाधिक परिपूर्ण आणि दिमाखदार कशी होईल हे पाहण्याची जबाबदारी आयोजकांवर येऊन पडते. त्यामुळेच स्पर्धा म्हणा किंवा शर्यत म्हणा, त्यातील खटकणाऱ्या काही गोष्टी पुढील स्पर्धा अधिक सुंदर होण्यासाठी मांडणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय मॅरेथॉन विजेत्यासाठी बक्षिसाची रक्कम कमी असल्याने अनेक नामवंत स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणे टाळतात, याची जाणीव आयोजकांना असून त्यात सुधारणा करण्याची ग्वाही त्यांनी याआधीच दिली आहे. आयोजक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी स्पर्धा आयोजनातील काही त्रुटी जाहीरपणे मांडण्याचे आणि मान्य करण्याचे धाडस दाखविले. हे निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल. अशावेळी बहुदा कोणतेही आयोजक आपल्या त्रुटी झाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु, नीलिमाताईंनी तसे केले नाही. पुढील वेळी त्रुटी दूर करण्याकडे लक्ष देण्यात येईल हे सांगण्याची दक्षताही त्यांनी घेतली.
यावेळच्या स्पर्धेच्या अनुषंगाने ठळकपणे खटकलेली गोष्ट म्हणजे धावन मार्गावरील वाहतुकीचे अडथळे. धावन मार्गावर चौका-चौकांमध्ये पोलीस असतानाही रस्ता ओलांडण्यासाठी वाहनांची होणारी गर्दी धावपटूंसाठी कमालीची त्रासदायक ठरली. वाहनांच्या गर्दीतून वाट काढत त्यांना पुढे जावे लागले. धावन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणारे अपयश हे त्यामागील प्रमुख कारण आहे. आयोजक संस्थेचा दबदबा लक्षात घेता वर्षांतून एकदा येणाऱ्या स्पर्धेसाठी फक्त चार ते पाच तास धावन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणे सहजशक्य आहे. स्पर्धेला एकीकडे राष्ट्रीय स्तरावरील म्हटले जात असल्याने अशा काही गोष्टींचा अडथळा दूर करणे भागच आहे. गंगापूर रस्त्यासारख्या मार्गावर हे शक्य होत नसल्यास धावन मार्गच बदलण्यास काय हरकत? उलट, या स्पर्धेस शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाकडून मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे गिरणारे परिसराने दाखवून दिले आहेच. त्यामुळे धावन मार्ग अधिकाधिक प्रमाणात ग्रामीण भागातून जाणारा असेल तर स्पर्धा निश्चितच धावपटूंच्या उत्साहात भर टाकणारी ठरेल. स्पर्धा संपल्यानंतर एकीकडे मंडपात समारोप कार्यक्रमाची लगबग सुरू असताना त्याचवेळी जवळच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थांतर्गत विविध शाळांनी सादर केलेले एकेक नृत्य अफलातून असेच होते. या नृत्यांना मोठय़ा प्रमाणावर युवा वर्गाकडून प्रतिसादही मिळत होता. परंतु, त्यात काही मुले (जी बहुदा संस्थेची नसावीत) जो धिंगाणा घालत होती, तो प्रकार अक्षरश: लाजीरवाणा होता. मंचावरून संबंधित शिक्षक-शिक्षिका वारंवार असा गोंधळ घालणाऱ्या मुलांना इशारा देत होते. पण, त्यांना कोणी जुमानत नव्हते. या ठिकाणापासून जवळच असलेल्या मंडपातील व्यासपीठावर संस्थेचे अनेक पदाधिकारी विराजमान झालेले होते. त्यापैकी अनेकांचे लक्ष सांस्कृतिक कार्यक्रमाकडेही होते. परंतु, त्यापैकी कोणालाही गोंधळ घालणाऱ्या मुलांना आवरले नाही. शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित संस्था कर्मचारी बघ्याची भूमिका घेत होते काय? बलदंड देहाचे ‘बाऊन्सर्स’ उपस्थित राहूनही मग त्यांचा उपयोग तो काय ? संस्थेचे विद्यार्थी इतका सुंदर कार्यक्रम करत असताना लहानग्या मुलींकडे पाहून विचित्र अंगविक्षेप करणाऱ्यांचा जागच्या जागी बंदोबस्त करण्याची गरज होती.