गोदावरी खोऱ्यात पुरेसे पाणी उपलब्ध; धरणांमधील गाळ सर्वेक्षणाद्वारे नवीन प्रकल्पासाठी चाचपणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे नाशिक-नगर आणि मराठवाडय़ात पाणीवाटपावरून उद्भवणारा वाद किमान पुढील पावसाळ्यापर्यंत शमला आहे. परंतु, भविष्यात तो कधी उफाळून येईल याचा नेम नाही. हे लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने गोदावरी खोऱ्यातील वरच्या भागातील १० धरणांमध्ये साचलेल्या गाळाचे मोजमाप हाती घेतले आहे. या धरणांची बांधणी होऊन तीन ते चार दशकांचा कालावधी लोटला आहे. पावसाच्या पाण्यासोबत वाहत येणाऱ्या मातीमुळे त्यांच्या साठवणक्षमतेवर परिणाम होतो. गाळ सर्वेक्षणाद्वारे उपरोक्त धरणांची कमी झालेली साठवणक्षमता स्पष्ट होईल. त्या आधारे उपरोक्त भागात नवीन धरण बांधता येईल काय, याची चाचपणी करण्यात येणार आहे.

मागील काही दुष्काळी वर्षांत नाशिक, नगर व मराठवाडय़ात पाण्यावरून सर्व पातळीवर संघर्ष झाला. तहानलेल्या मराठवाडय़ासाठी पाणी सोडण्यास नाशिक व नगर जिल्ह्य़ातून तीव्र विरोध करण्यात आला होता. या प्रश्नावरून जनहित याचिकाही दाखल आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गोदावरी खोऱ्यातील वरच्या भागातील अर्थात नाशिक व नगर जिल्ह्य़ातील धरणांतील गाळाचे सर्वेक्षण केले जात आहे. या भागातील काही मध्यम व मोठय़ा धरणांतील गाळ सर्वेक्षण यापूर्वीही झाले आहे. तशा काही प्रमुख धरणांसह बांधल्यापासून आजवर एकदाही सर्वेक्षण न झालेल्या एकूण दहा धरणांतील गाळाचे प्रमाण शोधण्याचे काम महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) करीत आहे. समन्यायी तत्त्वावर पाणीवाटपाचा लाभ अधिक्याने मराठवाडय़ास होतो, अशी नाशिक व नगरमधील अनेकांची धारणा आहे. गाळ सर्वेक्षणाद्वारे वरच्या भागातील धरणांच्या सध्याच्या साठवण क्षमतेचा उलगडा होईल. सद्य:स्थितीत गाळ सर्वेक्षण न झालेल्या धरणांची बांधणीवेळी जी पाणी साठवण्याची क्षमता होती, ती आजतागायत गृहीत धरली जाते. म्हणजे त्या त्या धरणात साचलेला गाळदेखील पाणी म्हणून मोजला जातो. त्याचा फटका लाभक्षेत्राला बसतो. वार्षिक पाणी नियोजनात त्या धरणातील गृहीत धरलेले पाणी पूर्णपणे त्या क्षेत्रास मिळत नाही. या सर्वेक्षणामुळे प्रत्येक धरणाच्या साठवणक्षमतेची अद्ययावत माहिती मिळणार असल्याने त्या आधारे पाण्याचे वार्षिक नियोजन करता येणार आहे.

काही वर्षांपूर्वी नाशिकमधील गंगापूर धरणाचे गाळ सर्वेक्षण झाले होते. तेव्हा त्यात ८.३३ टक्के गाळ असल्याचे निष्पन्न झाले. या धरणाची मूळ ७२०० असणारी साठवणक्षमता गाळामुळे ५६०० दशलक्ष घनफूटपर्यंत कमी झाल्याचे अभ्यासांती समोर आले. गोदावरी खोऱ्यात पाणी शिल्लक नसल्याने नवीन धरण बांधण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे कोणत्याही धरणासाठी आवश्यक ठरणारे ‘पाणी उपलब्धता प्रमाणपत्र’ दिले जात नाही. गाळामुळे गंगापूर धरणाची क्षमता १६०० दशलक्ष घनफुटांने कमी झाल्याचा मुद्दा मांडून त्या बदल्यात तेवढय़ाच क्षमतेचे ‘किकवी’ धरण बांधण्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळविण्यात यश आले होते. प्रत्येक धरणांतील गाळाचे प्रमाण समजल्यावर घटलेल्या क्षमतेच्या बदल्यात नवीन धरण किंवा गाळ उपसणे असे पर्याय उपलब्ध असतील. शिवाय या धरणांच्या जलसाठय़ाची सध्या जी आकडेवारी गृहीत धरली जाते, त्यात फेरबदल होतील. गाळामुळे ते पाणी नाशिक व नगर जिल्ह्य़ांतील लाभक्षेत्राला मिळतच नाही. समन्यायी तत्त्वावर पाणी वाटपात त्याचा विचार क्रमप्राप्त ठरणार आहे.

या वर्षी मुसळधार पावसामुळे नाशिक, नगर व मराठवाडय़ातही पाण्याची ददात नाही. तुडुंब भरलेल्या नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून दीड ते दोन महिने सलग पाणी सोडले गेले. एकटय़ा नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून आतापर्यंत तब्बल ५६ टीएमसी अर्थात ५६ हजार दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला देण्यात आल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.

या धरणांचे सर्वेक्षण होणार

न्यायालयाच्या निर्देशानुसार दहा धरणांचे गाळ सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये नाशिक व नगर जिल्ह्य़ातील मुळा, भंडारदरा, गंगापूर, दारणा, कडवा, मुकणे, मांडओहोळ, भोजापूर, गौतमी गोदावरी, आळंदी या दहा धरणांचा समावेश आहे. प्रगतिपथावर असणारे हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या दूरसंवेदन विभागाकडून सांगण्यात आले. गंगापूर धरणातील गाळ सर्वेक्षण काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते.

मेंढेगिरी समितीने गोदावरीतील खालच्या आणि वरच्या भागातील सर्व धरणांचा अभ्यास करून पाणीवाटपाचे सूत्र निश्चित केले. जलसंपत्ती नियामक प्राधिकरण आणि उच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली. खालचे जायकवाडी किती भरले, या आधारे वरच्या भागातील धरणांमधून किती पाणी सोडावे याचा त्यात अंतर्भाव आहे. जायकवाडी ६५ टक्के भरल्यास पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. परंतु, जायकवाडी कमी भरल्यास किती पाणी सोडावे याचे निकष ठरवून देण्यात आले आहे.

राजेंद्र जाधव (अध्यक्ष, जलचिंतन संस्था)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik nagar marathwada disputes water distribution issue
First published on: 20-09-2017 at 03:15 IST