नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजपाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असतानाच मुंढे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या बदलीने जर नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर खुशाल माझी बदली करावी, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावत तो पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न केले. अनावश्यक खर्चाला पायबंद घालत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घातला. या घडामोडींमुळे भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांचे समीकरण विस्कटले आणि अखेर मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची खेळी सत्ताधारी भाजपाने खेळली. एक सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर निर्णय होईल.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझी बदली करुन नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच माझी बदली करावी. माझ्यावर केलेले आरोप निराधार असून करवाढीबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. महापालिकेतील २२ ते २३ गावांमध्ये मातीचे रस्ते असतानाच दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर कोट्यवधीचा खर्च होतो. हा खर्च कशामुळे होतो, असा सवालही त्यांनी विचारला. वारंवार बदली होत असल्याने वाईट वाटते. पण निर्णय शेवटी सरकारचा असतो, असेही त्यांनी नमूद केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 4:16 pm