दिवाळी सुरू असताना गावी परतण्याच्या ओढीने मंगळवारी शेकडो प्रवासी बस स्थानक परिसरात आले. कोणाला घरी दिवाळी साजरी करण्याची उत्सुकता तर कोणाला श्राद्धविधीसाठी जाण्याची धडपड. कारणे काहीही असली तरी घरी जाण्याची ओढ सर्वाना अस्वस्थ करत होती. एसटीच्या बेमुदत संपाविषयी काहींनी परिवहन महामंडळास शिव्यांची लाखोली वाहिली तर काहींनी त्यांनाही सणवार आहेत, कुटुंब कबिला आहे, आपणच समजून घ्यायला हवे, असे सांगत संपकऱ्यांची बाजु घेतली. एसटी संपाविषयी प्रवाशांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत..

बहिणीला घरी आणायचे होते..

नगरला बहीण असते. तिला भाऊबीजेसाठी घरी आणायचे होते. संप होणार हे माहिती होते. त्यामुळे तडक आलो. पण बस नाही, सुरू होईल की नाही हे कोणी सांगत नाही. कंपनीकडून अधिक सुटी मिळत नाही. या स्थितीत जे दोन-चार दिवस मिळाले, ते बस कधी मिळेल या आशेने हेलपाटे मारण्यात घालवावे लागतील असे वाटते. सणोत्सवात संप करून काय मिळणार, त्यांचेही नुकसान आणि आपलेही.

– निंबा जाधव, नोकरदार

नातवंडासोबत दिवाळी साजरी करायची होती म्हणून..

अवकाळी पावसामुळे शेतीची सर्व कामे खोळंबली आहेत. मुलगी नाशिकला राहते. आता दिवाळीच्या सणात ती येते की नाही माहीत नाही. पण किमान आपले नातवंड सोबत हवे दिवाळी साजरी करायला या अपेक्षेने इकडे आलो. मुलेही मामाच्या गावाला जायचे म्हणून उत्सुक होती. पण संपाचे कळले आणि नाइलाजाने मुलांना घरी ठेवावे लागले. एका मुलीला घेऊन निघालोय. दुपारी दोननंतर संप मिटला तर ठीक नाहीतर मिळेल त्या वाहनाने पुढे जावे लागेल.

– भगवान पवार, शेतकरी, मालेगाव

सासुचा श्राद्धविधी

श्रीरामपूरला सासूचा श्राद्धविधी आहे. त्यासाठी सकाळीच निघाले. पण बस नसल्याने पहाटे पाचपासून स्थानकात थांबली आहे. संपाविषयी माहिती नव्हती. सणासुदीच्या काळात संप करताना किमान कोणाच्या घरी लग्नकार्य आहेत, काहींकडे सुतक याचा तर विचार करावा. किमान त्यासाठी काही व्यवस्था करावी. आम्ही रोजंदारीवर काम करणारे माणसे काळीपिवळी कशी परवडणार? सोबत शिदोरी घेतली आहे. पण बस सुरू झाली नाही तर ती तरी किती पुरेल?

– शोभा साळवे, गृहिणी

माहेरी जायचे होते पण..

येवल्याला माहेरी जायचे होते, पण संपाने त्यावर पाणी फिरवले. रिक्षावाल्यांकडून संपाची माहिती दिली नाही. खासगी बसने जायचे म्हटले तरी त्या आडवळणावर जायला कोणी तयार नाही. द्वारकापर्यंत जाऊन काही पर्यायी व्यवस्था पाहावी तर सोबत लहान मुलगा आहे. दोन वर्षांच्या मुलाला घेऊन चार तासांपासून बसची वाट पाहात आहे. संप मिटला तर ठाक नाही तर पुन्हा घरी जावे लागेल.

– अनिता सद्गीर (गृहिणी)

कर्मचाऱ्यांना समजून घ्यायला हवे

संप होणार माहिती होते, पण संपाविषयी असणाऱ्या अनिश्चिततेमुळे बस स्थानकावर आले. दोन-चार वर्षे झाले. माहेरी गेलेली नाही. सणासुदीच्या आम्हाला सुट्टय़ाही नसतात. या व्यापात कुठे पाच दिवसांचा आराम मिळाला म्हणून बीडला माहेरी जाण्याचे ठरविले. पण संपामुळे हा बेत फिस्कटणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. तुटपुंज्या पगारात निभावणार तरी कसे, बरे संपात काहींनी गाडी चालवायचे ठरवले तरी त्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? संपकऱ्यांना आपण समजून घेतले पाहिजे.

– डॉ. विजया वाड