शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस आयुक्त अपयशी ठरल्याचा सूर तीव्र होत असतानाच आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर लोकप्रतिनिधींनी बोट ठेवत सक्षम अधिकाऱ्याच्या नेमणुकीची मागणी केली असताना पोलीस यंत्रणेने आता हातपाय मारण्यास सुरूवात केली आहे. बेकायदेशीर मद्याची साठवणूक व विक्री, अवैध धंदे, झोपडपट्टीत कोम्बिंग ऑपरेशन अनधिकृत शस्त्र बाळगणे, गुन्हेगारांची धरपकड, जुगार अड्डे व अवैध मद्य विक्रेते आणि गल्लीबोळातील टवाळखोरांवर कारवाई करत पोलिसांनी धडपड चालवली आहे. तथापि, ओरड झाल्यावर कारवाई करण्याऐवजी ही मोहीम अविरतरपणे राबविण्याची खरी गरज असते. पोलीस आयुक्तांना त्याचाच आजवर विसर पडल्याची भावना सर्वसामान्यांमधून उमटत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी घटनांचा आलेख उंचावत आहे. कुंभमेळ्यातील बंदोबस्तातून मोकळा श्वास घेतल्यानंतर पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देतील, अशी अपेक्षा होती. तथापि, पोलिसांचा दरारा निर्माण करून गुन्हेगारी रोखण्यात ते अपयशी ठरल्याची भावना प्रकर्षांने उमटत आहे. सत्ताधारी भाजपचे लोकप्रतिनिधी असो, वा विरोधी काँग्रेस वा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असो, सर्वानी या भयग्रस्त स्थितीला पोलीस दलास जबाबदार धरले आहे. अंबडमधील वाहनांची जाळपोळ, खुनाच्या वाढत्या घटना आदी सत्र सुरू असताना पोलीस आयुक्तांनी नाशिकमध्ये शांतता असून गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले नसल्याचा दावा केला होता. ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सर्वसामान्यांकडून ओरड होऊ लागल्यानंतर आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी दोन ते तीन दिवसांपासून टवाळखोर, बेकायदेशीर घडामोडी, अवैध मद्यसाठा, जुगार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे या विरोधात खास मोहीम उघडली आहे.

या कारवाईत नीलेश विनायक कोळेकर हा तडिपार गुंड पोलिसांच्या हाती लागला. तडिपार गुंड शहरात खुलेआम फिरतात हे याआधी वारंवार पहावयास मिळाले आहे. मल्हारगेट पोलीस चौकीलगतच्या स्वागत कन्साराच्या खून प्रकरणातही एका तडिपार गुंडाला पोलिसांनी अटक केली. अंबड पोलिसांच्या हाती लागलेल्या कोळेकरविरुध्द विविध पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, लुटमार, घरफोडी, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. बुधवारी रात्रीच्या कारवाईत प्रतिबंधात्मक सहा, ३१२ हून अधिक टवाळखोर, ३७ हून अधिक गुन्हेगारांची तपासणी, अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक आदी कारवाई करण्यात आली आहे. तत्पुर्वी अवैध मद्याचा साठा व विक्री प्रकरणी २५ गुन्हे दाखल करण्यात आले. या शिवाय, नऊ जुगारांच्या अड्डय़ांवर छापा टाकून कारवाई केली गेली.

वाहनांची जाळपोळ व खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी ही मोहीम सुरू केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणेचे अस्तित्व कायमस्वरुपी रस्त्यावर दिसणे गरजेचे आहे. संशयित वा सोनसाखळी चोरटय़ांना अटकाव घालण्यासाठी पोलिसांनी जे काही विशिष्ट नाके तयार केले आहेत, त्या ठिकाणी महाविद्यालयीन युवा वर्गाची वाहने अडवून तपासणीचे काम चालते. या माध्यमातून पैसेही उकळले जात असल्याची संबंधितांची तक्रार आहे. म्हणजे, या तपासणी नाक्यावर गुन्हेगारांचा शोध घेण्याऐवजी पोलिसांना वेगळ्याच कामात रस असल्याची नागरिकांची भावना आहे.