News Flash

मद्यधुंद वाहनचालकांविरुद्ध गुन्हे

पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अनुचित प्रकारांना आळा

नाशिक शहरात ‘थर्टी फस्र्ट’च्या दिवशी ठिकठिकाणी अशी तपासणी करण्यात आली.

१०९ जणांवर कारवाई; पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अनुचित प्रकारांना आळा

नव्या वर्षांचे स्वागत मद्यपानाने करण्याची गेल्या काही वर्षांत रुजलेल्या परंपरेला यंदाचे वर्षही अपवाद ठरले नसून रात्रभर धांगडधिंगा करणारे, मद्यप्राशन करून धूम स्टाईल वाहने चालविणारे, दुचाकींवर क्षमतेहून जादा वाहतूक करणारे शेकडो वाहनधारक पोलिसांच्या कचाटय़ात सापडले. पोलीस यंत्रणेने ठिकठिकाणी राबविलेल्या मोहिमेंतर्गत शेकडो वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या १०९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त ४६२ वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.मध्यरात्री उशिरापर्यंत डीजे लावून धिंगाणा घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून ‘थर्टी फर्स्ट’ला वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे. तळीरामांसाठी हा खास दिवस. मद्यपानाद्वारे नवीन वर्षांचे स्वागत होते असा त्यांचा समज. यामुळे या दिवशी मद्यपींकडून घातला जाणारा गोंधळ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खुलेआम मद्यपान करणे, मग धूम स्टाईलने दुचाकी दामटणे, रस्तावर आरडाओरड करत गोंधळ घालणे, कर्णकर्कश आवाजात डिजे लावून धिंगाणा घालणे याद्वारे शहराच्या एकूणच शांततेला सुरुंग लावण्याचे काम संबंधितांकडून नेटाने केले जाते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा सक्रिय झाली होती. वाहतूक पोलिसांच्या मदतीने पोलीस यंत्रणेने शहरातील प्रमुख रस्त्यांवर लोखंडी अडथळे उभारून वाहन तपासणीची धडक मोहीम राबवून मद्यपींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. ३१ डिसेंबरला सायंकाळपासून जल्लोषाचे वातावरण होते.

शहरातील जवळपास सर्वच हॉटेल्स गर्दीने तुडुंब भरली होती. आसपासच्या वायनरीजसह अनेक ठिकाणी पार्टीज्चे आयोजन करण्यात आले. नववर्षांचे आपापल्या पद्धतीने स्वागत करत असताना मद्यपींनी गोंधळ घालण्याची परंपरा कायम ठेवली.  नवीन वर्षांचे स्वागत करताना नियमांचे पालन करण्याची तमा अनेकांनी बाळगली नाही. डीजे लावून शांततेला सुरुंग लावण्याचे काम काहींनी केले. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शेकडो वाहनधारकांवर केलेल्या कारवाईद्वारे एकाच रात्रीत हजारो रुपये दंड वसूल करण्यात आला.

रस्त्यावरील गोंधळ तापदायक

शहरातील कॉलेजरोड हा महाविद्यालयीन युवकांसाठी आवडता रस्ता. महत्वाच्या घडामोडींवेळी तरुणांकडून या रस्त्यावर जल्लोष केला जातो. मंगळवारी रात्री मोटारसायकल, चारचाकी अशा वाहनांद्वारे युवकांचे जत्थे परिसरात घोषणाबाजी करत फिरत होते. पोलीस यंत्रणेने या ठिकाणी वाहनांची तपासणी केली. या रस्त्यावरील नेहमीचा गोंधळ स्थानिकांसाठी तापदायक ठरला. नाशिकरोड, पंचवटी, गंगापूररोड, सिडको, सातपूर परिसरात मद्यपी वाहनधारकांकडून असाच गोंधळ घातला गेला. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुल्लडबाजी करणारे, मद्यपान करून वाहने दामटविणारे, डीजे लावून धांगडधिंगा घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत शेकडो वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात वाहनांची कागदपत्रे न बाळगणारे, मद्यपान करणारे, क्षमतेहून जादा प्रवाशांची वाहतूक, गोंधळ घालणे आदी वेगवेगळ्या कारणास्तव शेकडो वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यात मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी १०९ वाहनधारकांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.वाहनांची कागदपत्रे नसणे, हेल्मट परिधान न करणे आदी कारणावरून ४६२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2018 1:27 am

Web Title: nashik police action against drunk driving
Next Stories
1 स्वच्छतेसाठी त्र्यंबकमध्ये ‘निर्मल वारी’ अभियान
2 रहिवासी इमारतींमध्ये अवैध खाद्यपदार्थ व्यवसाय
3 नाशिक जिल्हा बँक, बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त
Just Now!
X