03 March 2021

News Flash

पोलिसांना उशिरा का होईना जाग

या वेळी काही गुन्हेगारांनी आपल्या घरात सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्याचे पाहून पोलीसही चक्रावले.

  पंचवटीत गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त करत साठा हस्तगत करताना पोलीस. 

पंचवटीत ठिकठिकाणी गुंडांची धरपकड

मागील काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पाश्र्वभूमीवर, गणेशविसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी विविध झोपडपट्टी परिसरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला. खुद्द पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल हेदेखील रस्त्यावर उतरले. या कारवाईत तीन-चार संशयित दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. या वेळी काही गुन्हेगारांनी आपल्या घरात सीसी टीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्याचे पाहून पोलीसही चक्रावले. हे कॅमेरे काढून टाकण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे.

मंगळवारी होणाऱ्या गणेशविर्सजनासाठी तयारी सुरू असताना पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी संवेदनशील भागात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले.

पंचवटी, आडगाव तसेच म्हसरूळ या पोलीस ठाण्यांसह भद्रकाली परिसरातही पोलिसांनी गुन्हेगारांची शोधमोहीम राबविली. या वेळी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टीत काही घरांबाहेर तीन ते चार संशयित दुचाकी आढळल्या. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. पोलिसांनी ती वाहने ताब्यात घेतली. वाघाडी परिसरात गावठी दारूचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. २० लिटर गावठी दारू जप्त केली. दरम्यान, फुलेनगर परिसरातील संशयित गुन्हेगार, नामचीन गुंड यांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. या वेळी संशयित घरी आढळले नसले तरी संबंधितांच्या घरावर व आसपास सीसी टीव्ही कॅमेरे लावल्याचे आढळले.

या प्रकाराने पोलीस अवाक्  झाले. संशयितांच्या कुटुंबीयांना कॅमेरे का लावण्यात आले, याची तुम्हाला काय गरज अशी विचारणा पोलिसांनी केल्यावर उत्तरे देताना त्यांची भंबेरी उडाली.

पोलीस आयुक्तांनी तातडीने हे सीसी टीव्ही कॅमेरे काढून टाकण्याची सूचना केली आहे. या मोहिमेत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, विजय मगर यांच्यासह आडगाव, पंचवटी तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखेचे सदानंद इनामदार, स्थानिक गुन्हे शाखेचे नारायण न्याहाळदे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.

गुन्हेगारांची यादी तयार

शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार आहे. संबंधितांवर मोक्का तसेच तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. शहर पोलीस समाजकंटकांवर वचक ठेवण्यासाठी मोहिमा राबविणार आहेत.

डॉ. रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 1:57 am

Web Title: nashik police combing operation nashik crime
Next Stories
1 ‘नाशिक सायकलिस्ट’ विश्वविक्रमासाठी सज्ज
2 पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी नाशिककर सज्ज
3 जलप्रदूषण रोखण्यासाठी ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रम
Just Now!
X