नाशिक : फेसबुकवर आपले खाते नाही. तरीदेखील आपल्या नावाने संदेश समाजमाध्यमांत फिरतात. अखेर आपणच सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार देऊन फेसबुकवरील अशी काही पाने तसेच ध्वनिचित्रफिती नष्ट केल्या, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

समाजमाध्यमांवर आपल्या नावाने फिरणाऱ्या अशा संदेशांची खुद्द पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांना दखल घ्यावी लागली. नांगरे पाटील हे स्पर्धा परीक्षांबाबत युवकांना मार्गदर्शन करतात. मुंबईवरील २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी दाखविलेले धाडस दूरचित्रवाणीवरून अनेकांनी पाहिले आहे. हॉटेलमध्ये एके ४७ सारखी आयुधे घेऊन शिरलेल्या दहशतवाद्यांवर पिस्तुलीतून त्यांनी गोळीबार केला होता. आपल्या कामामुळे सर्वसामान्यांमध्ये परिचित असणाऱ्या नांगरे पाटील यांचा चाहता वर्गदेखील मोठा आहे.

सोमवारी पत्रकार परिषदेत या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर त्यांनी आपले फेसबुकवर खाते नसल्याचे सांगितले. आपल्या नावाने कोणतेही संदेश फिरत असतात. त्यात तथ्य नाही. या संदर्भात आपण सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दिली. फेसबुकवरील आपल्या नावाशी निगडित काही पाने तसेच यूटय़ुबवरील काही ध्वनिचित्रफिती नष्ट करायला सांगितल्याचे नांगरे पाटील यांनी उत्तर दिले.