घरफोडय़ा, आर्थिक गुन्हे, वाहतुकीच्या अन्य समस्यांकडेही लक्ष द्यावे

नाशिक : माणसाला करायला जे काम जमते वा सोपे जाते, तेच तो करत असतो. नाशिक पोलिसांचे नेमके तेच झाले आहे. आपली प्रतिमा कर्तव्यदक्ष म्हणून दाखविणे भाग असल्याने हेल्मेट सक्तीसारखी नाटके केली जातात. पोलिसांनी घरफोडय़ा, सोनसाखळ्या पळविणे, आर्थिक गुन्हे, लैंगिक गुन्हे यांसारख्या मुख्य कामांसह शहरातील वाहतुकीच्या इतर समस्यांकडे थोडेफार जरी लक्ष दिले तरी नागरिकांचे जीवन सुकर होऊ  शकेल.

उदाहरणार्थ, शहरात ४० हजार रिक्षा विनापरवाना चालतात. त्यांची कधीही तपासणी होत नाही. सर्व रिक्षांचे मीटर हे औपचारिक लावलेले असतात. मला ४० वर्षांत एकदाही मीटरच्या रिक्षातून प्रवास करण्याचा योग आला नाही. पट्टय़ावर चालणाऱ्या रिक्षा सर्रासपणे क्षमतेहून अधिक प्रवासी भरून पोलिसांच्या नाकावर टिच्चून बेकायदेशीर वाहतूक करीत असतात. त्यांच्यावरच्या कारवाईसाठी चौकाचौकात वाहतूक पोलीस तैनातही केलेले असतात, पण कारवाई होत नाही. नाशिकरोडसारख्या काही भागातील रिक्षावाल्यांवर पोलीस कारवाई करायला धजत नाहीत. द्वारका चौफुली तर अवैध वाहतूक करणाऱ्यांना आंदण दिली आहे. इतर ठिकाणी नागरिकांनी तक्रार केल्यावर पोलीसच ‘जाऊ  द्या ना साहेब, कशाला त्यांच्या नादी लागता ?’ असा सल्ला देतात. पोलिसांचे हे प्रेम कशापोटी असते, हे आता जाहीर सत्य झाले आहे. सीबीएस चौकातच नव्हे, पंचवटीसारख्या धार्मिक ठिकाणीही अंगावर गणवेश धारण केलेले पोलीस रिक्षावाल्यांचा मार खातात ते दृश्य फार दु:खदायक दिसते. बेकायदा वाहनतळातील गाडय़ांविरुद्ध कारवाईआधी वाहनतळाच्या जागा निश्चित करून, तसे फलक लावून मग कारवाई समजू शकते. याबाबतीत कधी पोलीस, महानगरपालिका आणि परिवहन खाते यांनी एकत्र बसून या समस्येवर तोडगा काढायचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

हेल्मेट सक्तीबाबत पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत अनेक वाद आहेत. नाशिक शहरातील रस्त्यांचे आकार, अवस्था लक्षात घेता कुठलेही वाहन

वीस-तीसपेक्षा जोरात जाऊ  शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात ही सक्ती राजमार्ग वा शहराबाहेरील रस्त्यांसाठी असावी. त्याबद्दल पोलीस काही बोलायला तयार नाहीत. हेल्मेट न घातलेला एखादा नागरिक दिसला की तो अतिरेकी असल्याप्रमाणे त्याच्यावर सारे धावून जातात. हे चित्र पोलिसिंग पाश्र्वभूमीवर विरोधाभासी आहे. इतर वेळी मनुष्यबळाची सबब सांगणाऱ्या पोलिसांना अशा नागरिकांना त्रास देणाऱ्या कार्यक्रमासाठी जथ्थेच्या जथ्थे कुठून मिळतात हे कळत नाही. अशीच कार्यक्षमता सर्व ठाण्यांमध्ये तपास प्रलंबित असलेल्या गुन्ह्य़ांसाठी वापरावी.

नवे आलेले पोलीस आयुक्त आपली प्रतिमा जपण्यात प्रसिद्ध समजले जातात. त्याबद्दल हरकत असण्याचेही काही कारण नाही. परंतु पोलिसांची भूमिका स्पष्ट करताना नागरिकांच्या पोलिसांबाबत ज्या काही भावना आहेत, त्यांची तुम्ही कधी दखल घेणार आहात? केवळ कायद्याचा  बाऊ  करत नागरिकांचा अनाठायी छळ करणे हे ‘सद् रक्षणाय खल निग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पोलीस खात्याला निश्चितच शोभत नाही हे नाइलाजाने व्यक्त करावे लागते. आता पोलिसांनी हाती घेतलेली हेल्मेट सक्ती पुढेही चालू ठेवावी. परंतु आपली पोलीस ठाणी आणि पोलीस यांच्याही अंतरंगात थोडेसे झाकून बघावे. म्हणजे आपण जे काही करतोय ते समर्थनीय आहे काय, हे लक्षात येईल.

शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, शहर पोलिसांनी वाहनधारकांविरोधात कारवाईचे अस्त्र उगारले आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी हेल्मेट सक्ती, हा त्यातील मुख्य भाग. या पाश्र्वभूमीवर, ज्येष्ठ कृषी अभ्यासक डॉ. गिरधर पाटील यांनी मांडलेली मते, त्यांच्याच शब्दात.