22 November 2017

News Flash

‘सिंगल’ नव्हे, तर ‘सिंघम’ व्हावे

मागील दीड वर्षांत पोलीस आयुक्तालय अधिक्याने उपक्रमशीलतेकडे झुकल्याचे दिसून येते.

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: September 14, 2017 3:00 AM

नाशिककरांची पोलीस आयुक्तांकडून अपेक्षा; सहा महिन्यांत दाखल झालेल्यापकी ४३ टक्के गुन्ह्य़ांचा तपास नाही

बेशिस्त वाहनधारकांविरोधात एकाच वेळी ५२ ठिकाणी नाकाबंदी करीत धडक कारवाई करणारी पोलीस यंत्रणा गुन्हेगारांऐवजी वाहनधारकांच्या मागे लागल्याचे चित्र शोभादायक नसल्याची प्रतिक्रिया सध्या शहरात उमटत आहे. जानेवारी ते जून या कालावधीत दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ४३ टक्के गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. या स्थितीत गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी उपरोक्त पद्धतीचे अनुकरण का केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आयुक्तांनी ‘सिंगल’ नव्हे तर ‘सिंघम’ व्हावे अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.

मागील दीड वर्षांत पोलीस आयुक्तालय अधिक्याने उपक्रमशीलतेकडे झुकल्याचे दिसून येते. विविध उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांशी संवाद साधण्याचा यंत्रणेचा प्रयत्न असला तरी वाढत्या गुन्हेगारीबाबत मौन बाळगले जाते. पोलीस आयुक्त तर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सदा रमलेले दिसतात. गुन्हेगारी घटना घडत असताना त्यांचा छडा लावण्याऐवजी अवघी यंत्रणा कधी ‘नो हॉर्न डे’ तर कधी ‘हेल्मेट जनजागृती’ अशा उपक्रमांमध्ये अडकून पडल्याचे लक्षात येते. आयुक्तालयाच्या अखत्यारीत वाहतुकीला शिस्त लावणे, वाहनधारकांवर कारवाई आदींसाठी वाहतूक ही स्वतंत्र शाखा अस्तित्वात आहे. या शाखेच्या अनेक मोहिमांमध्ये वारंवार सर्वच्या सर्व १३ पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उतरवले जाते.

दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान करावे, यासाठी जनजागृती करूनही उपयोग होत नसल्याने कठोर भूमिका घेतली गेली. मंगळवारच्या कारवाईसाठी ५२ ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी करण्यात आली. सुमारे साडे पाच हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत २२ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला गेला. मुळात वाहतूक शाखेने नवीन वर्षांच्या सुरुवातीला काही उद्दिष्टे जाहीर केली होती. त्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविणे, वाहनतळाची व्यवस्था, प्रबोधन, अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई आदींचा अंतर्भाव होता. वर्ष संपुष्टात येण्यास तीन महिन्यांचा अवधी असताना ही उद्दिष्टे कितपत साध्य झाली, याकडे लक्ष वेधले जाते. बेशिस्त वाहतुकीविरोधात कारवाई करताना सोयीस्करपणे त्यातून रिक्षाचालकांचा उद्दामपणा ज्या भागांमध्ये अधिक होतो, अशी ठिकाणे वगळली जातात. (उदा. शालिमार, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, नाशिकरोड रेल्वे स्थानक आदी.)

कधीकाळी शांत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये मागील काही वर्षांत राजाश्रयामुळे गुन्हेगारी फोफावली. अनेक गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या. त्यांच्या कारवायांनी शहर वारंवार वेठीस धरले गेले. त्यातील काही टोळ्यांवर कारवाई झाली असली तरी गुन्हेगारीचा आलेख मात्र खाली आलेला नाही. चोरी, सोन साखळी खेचून नेणे, दुचाकी, वाहन चोरी आदी गुन्ह्यांचे तपास लागत नाहीत. सणोत्सवातील ताण सहन करत अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांचा माग काढावा लागतो.

या स्थितीत कामाचे जे दिवस हाती आहेत, ते याच पद्धतीने निव्वळ उपक्रमात जात असल्याची काहींची भावना आहे. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पंचवटीत गुन्हेगारांच्या शोधासाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले गेले. त्यात स्वत: आयुक्तांनी नेतृत्व केल्याने नाशिककरांना आनंद झाला. परंतु, हे नेतृत्व मात्र एकदाच दिसले. ‘सिंगल’ यांनी ‘सिंघम’सारखी कारवाई करण्याची अपेक्षा नाशिककरांना असली तरी त्याचे दर्शन मात्र अद्याप एकदाही झालेले नाही.

उलट पोलिसांनाच बेशिस्त रिक्षाचालकांकडून मार खावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र नाशिकमध्ये दिसत आहे. हे चित्र उलट व्हावे हीच अपेक्षा असली तरी त्यादृष्टीने आयुक्तांनीच कठोर भूमिका घेणेही आवश्यक आहे. काही घटनांविषयी आपले संवेदनशील मन पत्रांद्वारे उघड करणारे पोलीस आयुक्त गुन्हेगारांच्या बाबतीत अशी संवेदनशीलता न ठेवता कठोर कधी होणार? सामाजिक उपक्रमांमध्ये मिरवण्यापेक्षा असा कठोरपणा दाखविणारे अधिकारीच जनतेच्या लक्षात राहतात हे याआधीच्या आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे लक्षात येते.

काही वर्षांपूर्वी गुन्हेगारांच्या शोधासाठी सर्वत्र अविरतपणे ‘कोम्बिंग’ मोहीम राबविली जायची. त्यात सातत्य राखल्याने गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले होते. तथापि, मागील एक ते दीड वर्षांत अपवादाने अशा मोहिमा राबविल्या गेल्या. गुन्हेगारी घटनांना अटकाव घालण्यासाठी अवघी पोलीस यंत्रणा कार्यप्रवण राहिल्यास चित्र बदलू शकते. रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिलांचे दागिने खेचून नेण्याचे प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. ते रोखण्यासाठी अवघी पोलीस यंत्रणा कधी रस्त्यावर उतरल्याचे ज्ञात नसल्याची महिला वर्गाची भावना आहे.

अनेक गुन्हे तपासाविना

जानेवारी ते जून २०१७ या कालावधीचा विचार करता १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आतापर्यंत विविध स्वरूपाच्या १७४७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील ९७५ प्रकरणांचा तपास करण्यात यंत्रणेला यश मिळाले. हे प्रमाण ५७ टक्के आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा विचार करता खुनाचे २१,  तितक्याच संख्येने खुनाचा प्रयत्न, १३ बलात्कार, दरोडय़ाचे सात, इतर दरोडा व चोरीचे एकूण २६१, महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याचे ५४, दुचाकी वाहन चोरीचे तब्बल २८१, हाणामारीचे ३५ आदींचा समावेश आहे. याच काळात पोलिसांनी १५१ जुगार अड्डय़ांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा टाकण्याची तयारी या गुन्ह्यांचा १०० टक्के तपास करण्यात यंत्रणेला यश मिळाले. तथापि, वाहन चोरीचे केवळ १८ टक्के, सोन्याचे दागिने खेचून नेण्याचे गुन्हे ११ टक्के, इतर दरोडा व चोरीचे १९ टक्के गुन्ह्यांचा तपास करणे पोलीस यंत्रणेला शक्य झाले आहे. उर्वरित गुन्ह्यांतील संशयितांचा छडा अद्याप लागलेला नाही.

First Published on September 14, 2017 3:00 am

Web Title: nashik police indiscipline vehicle owners