नाशिक पोलिसांची अवस्था

‘नो हॉर्न डे’, हेल्मेटबाबत कधी जनजागृती तर कधी कारवाई, असे विविध उपक्रम राबविताना दुसरीकडे गुन्हेगारी घटनांच्या वाढत्या आलेखाकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्याची झळ खुद्द पोलिसांनाही वारंवार बसत असल्याचे दिसून येते. कोणीही यावे आणि पोलिसांना मारहाण करावी, अशा घटना वरचेवर घडत आहेत. अलीकडेच मुजोर वाहनधारकाने तर थेट अंगावर गाडी घालण्याचा प्रकार केला होता. त्यात पोलीस अधिकारी जखमी झाला.

चालू वर्षांत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्य़ांपैकी जवळपास ४३ टक्के गुन्ह्य़ांचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यात दुचाकी वाहन चोरी, सोन्याचे दागिने खेचून नेणे, इतर दरोडा व चोरी आदी गुन्ह्य़ांचा समावेश आहे.

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रवींद्र सिंगल यांनी अनेक नवीन उपक्रम राबविले. वाहनधारकांच्या सुरक्षेची जशी काळजी केली, तशीच पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची घेतली, परंतु त्यांनी सुरू केलेले काही उपक्रम नव्याची नवलाई ठरले.  शहरात किमान आवाजाच्या बाबतीत शांतता राहावी, यासाठी ‘नो हॉर्न डे’ उपक्रम सुरू केला तोदेखील फलद्रूप झाला नाही.  त्यासाठी महिनाभर शालेय विद्यार्थ्यांच्या सोबतीने ठिकठिकाणच्या सिग्नलवर जनजागृती केली. नंतरअकस्मात सारे अंतर्धान पावले. आता सोमवार हा ‘नो हॉर्न डे’ दिवस होता हेदेखील कोणाच्याही स्मरणात नाही. कोणत्याही रस्त्यावर सोमवारसह अन्य दिवशीही ‘कर्णकर्कश हॉर्न’ कानी पडतात. पोलिसांचा वचक कमी झाल्याचे हे निदर्शक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्यास पोलिसांशी या पद्धतीने वर्तन करण्याचे धाडस कोणी करू शकणार नाही. त्याकरिता मुजोर वाहनधारकांबरोबर गुन्हेगारांवरही आधी वचक निर्माण करावा लागेल. वाहनधारकांविरोधात अवघी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरल्याच्या दुसऱ्याच दिवशी शहरात सोनसाखळी खेचून नेण्याचे पाच ते सहा प्रकार घडले. महत्त्वाची बाब म्हणजे, एका घटनेत दुचाकीवर आलेल्या चोरटय़ांनी हेल्मेट परिधान केल्याचे सांगितले जाते. दुचाकीच्या डिकीतून रोकड लंपास होणे, वाहन चोरीला जाणे, दागिने लंपास होणे हा आलेख वरच्या दिशेने जात असताना वेगवेगळ्या उपक्रमांत अडकलेली पोलीस यंत्रणा शहरावर आपला वचक कधी प्रस्थापित करणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

पंधरा दिवसांत मारहाणीच्या चार घटना

गुन्हेगारी घटनांबरोबर वाहनधारकांची मुजोरी वाढल्याचे लक्षात येते. मागील पंधरा दिवसांत पोलिसांना मारहाण होण्याच्या चार घटना घडल्या आहेत. शालिमार चौकात फ्रंट सिट कारवाई केल्याच्या कारणावरून दोन रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती. या वेळी हातातील बिनतारी यंत्रणा जमिनीवर पडल्याने नुकसान झाले. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत झाली. गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान भद्रकाली टॅक्सी स्टॅण्ड परिसरात रस्त्यावर वाद घालणाऱ्या दोघांना समजावणाऱ्या पोलिसांना मारहाण झाली होती. या वेळी एका संशयिताने पोलिसांना तलवार दाखविण्यापर्यंत मजल गाठली. सातपूरच्या आयटीआय सिग्नलवर विनाहेल्मेट वाहनधारकांवर कारवाई करताना एकाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर दुचाकी घातल्याची घटना घडली. त्यात वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक सुरेश भाले जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच मोटारसायकलस्वाराने कार्बन नाका परिसरात पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. गत महिन्यात एका महिलेने पोलिसावर हात उगारण्यापर्यंत मजल गाठली. यापूर्वी रिक्षाचालकांकडून पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलीस कर्मचारी मार खात असताना आयुक्तांकडून कोणतीही कठोर कारवाई करण्यात येत नसल्याबद्दल खुद्द कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.