दहा जण ताब्यात

निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरी तालुक्यात ललनांच्या सहभागाने होणारी नृत्य पार्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली रिसोर्ट परिसरात सुरू असलेल्या नृत्य पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी नाशिकच्या एका स्वयंघोषित पत्रकार संघटनेच्या अध्यक्षासह १० जणांना अटक केली. या पार्टीसाठी मुंबईहून आलेल्या सहा मुलींनाही ताब्यात घेण्यात आले. स्वयंघोषित पत्रकार डॉ. राहुल जैन-बागमारने कारवाई होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.

मागील काही वर्षांत इगतपुरी तालुका ललनांच्या सहभागाने होणाऱ्या बीभत्स मद्य पाटर्य़ामुळे गाजत आहे. या अनुषंगाने पोलीस कारवाई करीत असले तरी अधूनमधून हे प्रकार घडत आहेत. या एकंदर स्थितीचा स्थानिक ग्रामस्थांना त्रास होत आहे. तळेगाव शिवारात मिस्टिक व्हॅली नामक रिसॉर्ट आहे. तेथील नऊ क्रमांकाच्या बंगल्यात रविवारी मध्यरात्री कर्णकर्कश आवाजात नृत्य पार्टी रंगल्याचे समजल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी पायात घुंगरू, कमी कपडे घालून मुली नृत्य करीत होत्या, तर १० जण मद्याच्या नशेत नाचत होते. पोलिसांनी संशयित, स्वयंघोषित पत्रकार संघटनेचा अध्यक्ष डॉ. राहुल जैन-बागमार (३३, बागमार भवन, रविवार पेठ), अनिल बर्गे (४२, देशपांडे वाडा, जुने नाशिक), लक्ष्मण पवार (३१, फुलेनगर), प्रकाश गवळी (३३, चतु:संप्रदाय आखाडा), अर्जुन कवडे (२३, शांतीनगर, मखमलाबाद), बासू नाईक (४४, खडकाळी), आकाश गायकवाड (१९, पाथर्डी फाटा), हर्षद गोठी (२७, वासननगर), चेतन केवरे (३०, एलआयसी कॉलनी), काशी पंडित (३५, शिंगाडा तलाव) यांना ताब्यात घेण्यात आले. नृत्य करणाऱ्या सहा मुलींनाही पकडण्यात आले.  पोलिसांनी अकस्मात धरपकड सुरू केल्यावर गोंधळ उडाला.

या वेळी स्वयंघोषित पत्रकार संघटनेचा अध्यक्ष म्हणविणाऱ्या डॉ. राहुल जैन-बागमारने पोलिसांशी अरेरावी करीत गोंधळ घातल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पत्रकाराने कारवाई होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.

स्थानिकांसाठी डोकेदुखी

मुंबई, ठाण्याच्या समीप असलेल्या इगतपुरीत काही वर्षांत डान्स पार्टी, रेव्ह पार्टीसारखे प्रकार वाढत आहेत. मुंबई, पुण्यातील बडय़ा असामींची मुले या ठिकाणी अशा पार्टीमध्ये सहभागी होत असल्याचे उघड झाले होते. काही महिन्यांपूर्वी अशाच एका कारवाईत असे संशयित पोलिसांच्या हाती लागले होते. परिसरातील डोंगर-दऱ्यांमध्ये काही रिसॉर्ट, मुंबईतील धनिकांचे बंगले आहेत. पार्टीद्वारे घातला जाणारा धांगडधिंगा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मुंबईसह इतर शहरांतील धनिकांप्रमाणे नाशिकमधील काही घटक बीभत्स पार्टीसाठी या भागाकडे आकर्षित होत असल्याचे या घटनेतून समोर आले.