01 March 2021

News Flash

असा ‘बाहुबली’ भाजपला चालतो कसा?

या पाश्र्वभूमीवर, जादा कुमक मागवत पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळविण्याची धडपड केली.

पवन पवारच्या घरातून शस्त्रास्त्रे जप्त

शहरात तणावपूर्ण स्थिती असताना थेट पोलिसांना आव्हान देत हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा भाजपवासी नगरसेवक पवन पवारच्या घरातून दोन पिस्तुले, जांबिया व तलवार असा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आल्यामुळे त्याच्या कारनाम्यांवर नव्याने प्रकाश पडला आहे. बुधवारी पोलीस संचलनादरम्यान पवारने पोलिसांशी हुज्जत घातली होती. त्याच्या भावाने उपायुक्तांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी त्याला चोप देऊन अटक केली. पोलीस कर्मचाऱ्याचा खून व खंडणीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पवन पवारला अलीकडेच भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. त्याला पक्षात घेण्यावरून पक्षातील एका गटाने तीव्र विरोध दर्शविला. तथापि, महापालिका निवडणुकीत बाहुबलीचा लाभ होईल हे गृहीतक ठेवणाऱ्या भाजपच्या गळ्यातील पवार हे लोढणे ठरल्याचा सूर आता पक्षाच्या वर्तुळात उमटत आहे.

तळेगावच्या घटनेनंतर वातावरण निवळत असताना दसऱ्याच्या दिवशी अनेक भागांत दुचाकीवर आलेल्या टोळक्यांनी धुडगूस घालत वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली. नाशिक रोड, जेल रोड परिसरात दगडफेकीचे सत्र सुरू होते. या पाश्र्वभूमीवर, जादा कुमक मागवत पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळविण्याची धडपड केली. त्या अंतर्गत ज्या ठिकाणी दगडफेक व तत्सम दहशत माजविण्याचे प्रकार घडत होते, त्या भागात संचलन करीत दंगेखोरांवर कारवाईस सुरुवात केली. जेल रोड भागात हे संचलन सुरू असताना नगरसेवक पवार हा भाऊ विशाल व ४० ते ५० समर्थकांसह बाहेर उभा होता. पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी त्याला जमावबंदी लागू असून असे बाहेर उभे राहू नका असे बजावले. या वेळी संबंधितांनी जमावबंदी आम्हाला लागू नाही, तुम्ही तुमचे काम करा असे उलट सुनावण्याची हिंमत दाखविली. इतकेच नव्हे, तर विशाल पवारने धक्काबुक्कीचाही प्रयत्न केला. या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधितांना चोप देऊन अटक केली. जखमी पवार व त्याच्या भावाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधितांविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी पवारच्या घराची झडती घेण्यात आली. त्या वेळी पिस्तुले, तलवार, जांबियासारखी घातक शस्त्रे घरात दडवून ठेवण्याचे उघड झाले.

जेल रोड परिसरात बाहुबली पवारची दहशत आहे. अलीकडेच महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या काळात शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी त्याला भाजपमध्ये प्रवेश दिला होता. विधानसभा निवडणुकीत पवारच्या सहकार्याने आपण विजयी झाल्याची भावना सानप यांनी तेव्हा व्यक्त केली होती. पवारच्या प्रवेशावरून भाजपमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले होते. काही विशिष्ट व्यक्तींनी पक्षावर वर्चस्व प्रस्थापित करीत परस्पर निर्णय घेणे सुरू केल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला. या घडामोडींची तक्रार थेट प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांपर्यंत करण्यात आली. परंतु पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर विजय मिळाल्याने भाजपने पवनला पावन केल्याचा संदेश गेला. याच पवनच्या कार्यशैलीने आता भाजप अडचणीत आला आहे. नाशिक रोड परिसरात जमावाला चिथावणी देण्यामागे त्याचा हात असल्याचा संशय आहे. त्याला अटक झाल्यानंतर जमावाने भीमवाडी परिसरात पोलिसांवर दगडफेक केली. या ठिकाणी पोलिसांना कारवाई करावी लागली. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या पवारची ही ओळख समोर आल्याने गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस त्याच्याबाबत काय निर्णय घेणार हे गुलदस्त्यात आहे. या संदर्भात शहराध्यक्षांशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही ते उपलब्ध झाले नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 4:08 am

Web Title: nashik police recover weapons from house of bjp leader pawan pawar
Next Stories
1 वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात १२ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग
2 ‘ऑक्टोबर हीट’मुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट
3 ..अखेर पोलीस सर्वशक्तिनिशी रस्त्यावर
Just Now!
X