सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; १४ लाखांचे सोने हस्तगत

भारतात घरफोडी, चोरीतून मिळणाऱ्या रकमेतून नेपाळमध्ये  मालमत्ता खरेदी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या रकमेतून नेपाळमध्ये त्याने दोन हॉटेल खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे, तर रिसॉर्ट खरेदीसाठी त्याला पैशांची निकड भासल्याने चोरी करण्यासाठी तो पुन्हा भारतात आला असता शहर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

टागोरनगर परिसरातील भरत गांग यांच्या बंगल्यात २०१६ मध्ये ३० ते ३१ ऑक्टोबर दरम्यान चोरी झाली होती. खिडकीचे गज कापून चोरटय़ाने दागिने, रोख रक्कम लंपास केली होती. याच स्वरूपाचे गुन्हे इतरत्रही दाखल झाले होते. चोरीच्या घटनांचा तपास शहर गुन्हे शाखेमार्फत सुरू होता. चोऱ्यांमध्ये सराईत गुन्हेगार गणेश भंडारीचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हा केल्यापासून संशयित नेपाळ येथे गेला होता. त्यामुळे गुन्ह्य़ाच्या तपासात प्रगती होत नव्हती. पोलीस पथकाने नेपाळ येथे जाऊन संशयिताचा शोध घेतला. परंतु, तो मिळून आला नाही. या पाश्र्वभूमीवर, राज्य गुन्हे विभागामार्फत या संशयिताचे प्रत्यार्पण करण्यासाठी इंटरपोलकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानेही काही साध्य झाले नाही. जंग जंग पछाडूनही संशयित हाती लागत नव्हता.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ आणि त्यांच्या पथकाने संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. १४ फेब्रुवारी रोजी संशयित गणेश भंडारी हा सीबीएस परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पथकाने तातडीने सीबीएसजवळ सापळा रचून संशयिताला अटक केली. चौकशीत संशयिताने चोरलेले दागिने मुंबई येथे विकल्याचे सांगितले. पोलीस पथकाने मुंबईत जाऊन सुमारे १४ लाख रुपये किमतीचे ५४७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. संशयिताच्या अटकेने मुंबई उपनगर, गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

या संशयिताची माहिती इंटरपोलमार्फत नेपाळ पोलिसांना देण्यात येणार आहे. या बाबतची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद वाघ, साहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, महेश कुलकर्णी, दीपक गिरमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लहानपणापासून चोरी; नेपाळमध्ये दोन हॉटेल खरेदी

संशयिताची चोरी करण्याची कार्यपद्धती पोलिसांना चक्रावणारी ठरली. संशयित भंडारी हा लहानपणापासून घरफोडी, चोरी करीत असे. त्याच्याविरुद्ध सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यासह नाशिक शहरातील विविध ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरीचे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. गुन्हा करताच तो नेपाळमध्ये पळून जात असे. चोरीच्या पैशातून त्याने नेपाळमधील पोखरा येथे दोन हॉटेल खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयिताला रिसॉर्ट खरेदी करायचे होते. त्यासाठी पैशांची गरज भासल्याने तो चोरी करण्यासाठी पुन्हा भारतात आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.