रेल्वे स्थानकाची स्वच्छता, कचरा, मलजलाची योग्य पद्धतीने विल्हेवाट, रेल्वे आणि तिच्या मार्गाची साफसफाई यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन नाशिकरोड रेल्वे स्थानकास ‘आयएसओ १४००१’ आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाले आहे. पुढील टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगाव, जळगाव आणि मनमाड रेल्वे स्थानकासही आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

स्थानकाचे परीक्षण करणाऱ्या संस्थेने काही सूचना केल्या असून त्यात स्थानकावरील खाद्यगृहातील स्वच्छता, कचरा साचणाऱ्या जागेची साफसफाई आदींचा अंतर्भाव आहे. हे प्रमाणपत्र स्थानकाला मिळाले असले तरी दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेगळा अनुभव आहे.  भुसावळ-मुंबई मार्गातील महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकरोड स्थानकावरून दररोज ८४ प्रवासी गाडय़ा धावतात. त्यातून हजारो प्रवाशांची वाहतूक होत असते. नाशिकहून दररोज मुंबईला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकरोड रेल्वे स्थानकासह परिसरात काही विकासकामे केली गेली. त्यानंतर स्थानकातील व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याची प्रवाशांची भावना होती.

वर्षभरापासून नाशिकरोड स्थानकाला पर्यावरणस्नेही बनविण्याचा प्रयत्न केला जात असून त्याचे फलित या आंतरराष्ट्रीय मानांकनात झाल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.  स्थानकातील स्वच्छता राखण्यात सातत्य, कचरा, मलजलाच्या योग्य पद्धतीने विल्हेवाट रेल्वे मार्गाची स्वच्छता आदी निकषांवरून हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे भुसावळ स्थानकाचे प्रमुख जी. आर. अय्यर आणि नाशिकरोड स्थानकाचे आर. के. कुठार यांनी सांगितले. पुढील टप्प्यात भुसावळ विभागातील १२ स्थानकांना हे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील मनमाडसह जळगाव आणि चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी स्वच्छतेबाबत समाधानी आहेत. पण त्यात आणखी सुधारणा करण्यास वाव असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील इतर कोणत्याही स्थानकापेक्षा नाशिकरोड रेल्वे स्थानकात स्वच्छतेकडे अधिक्याने लक्ष दिले जाते. दिवसभर हे काम सुरू असते. यामुळे इतर स्थानकांपेक्षा नाशिकरोड स्थानक स्वच्छ असते. ऐनवेळी त्रास होणाऱ्या रुग्णांना स्थानकाबाहेर उचलून नेण्यासाठीची (स्ट्रेचर) कमतरता आहे. ऐनवेळी हे साहित्य कुठे असते, ते अनेकांना माहिती नसते. यामुळे ‘स्ट्रेचर’ची उपलब्धता करण्याचा प्रयत्न आहे.

– राजेश फोकणे (सदस्य, रेल्वे सल्लागार समिती)