08 March 2021

News Flash

गतवर्षीच्या तुलनेत ३१ टक्के कमी जलसाठा

सलग तीन ते चार दिवस झालेल्या संततधारेमुळे दुष्काळाचे सावट दूर होण्याची आशा पल्लवीत झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील जलसाठय़ाचा विचार

नाशिक जिल्ह्यतील धरणांची स्थिती
सलग तीन ते चार दिवस झालेल्या संततधारेमुळे दुष्काळाचे सावट दूर होण्याची आशा पल्लवीत झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील जलसाठय़ाचा विचार करता गतवर्षीच्या तुलनेत तो अद्याप ३१ टक्क्यांनी कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दारणा व गंगापूर धरण समूहात काहिशी समाधानकारक स्थिती आहे. मात्र, पालखेड समूह व गिरणा खोऱ्यातील धरणांमध्ये अद्याप समाधानकारक जलसाठा झालेला नाही. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल की नाही, अशी भ्रांत सर्वसामान्यांना पडली आहे.
लहरी पावसाने या वर्षी नाशिकवर सुरूवातीपासून वक्रदृष्टी फिरविली. प्रारंभी चार ते पाच दिवस हजेरी लावल्यानंतर तो अंतर्धान पावला. अधुनमधून रिमझिम स्वरुपात हजेरी लावल्यानंतर एक ते दीड महिना तो गायब झाला. या एकंदर स्थितीमुळे ऐन पावसाळ्यात शेकडो गाव व पाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करणे क्रमप्राप्त ठरले. या घडामोडीत चार-पाच दिवसांपूर्वी त्याचे जोरदार पुनरागमन झाले. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत त्याने जोरदार हजेरी लावली. पहिल्या दिवशीचा जोर नंतर कमी झाला. पण, संततधार सुरू राहिली. या चार दिवसात झालेल्या पावसाने जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट कमी करण्यास हातभार लागल्याचे चित्र आहे. हे संकट पूर्णपणे दूर होण्यासाठी धरणांमधील जलसाठा उंचाविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांचा विचार केल्यास त्यांची एकुण ६६ हजार ३५४ दशलक्ष घनफूट इतकी क्षमता आहे. सद्यस्थितीत त्यात ३१ हजार ५१ दशलक्ष घनफूट म्हणजे ४७ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी हा जलसाठा ५१ हजार ४२६ दशलक्ष घनफूट (७८ टक्के) होता. दोन्ही वर्षांचा विचार करता यंदा हा जलसाठा ३१ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसते.
धरण समूहनिहाय आणि खोरेनिहाय विचार केल्यास गोदावरी व दारणा धरण समुहात स्थिती काहीशी बरी आहे. गंगापूर धरण समूहात एकुण ९ हजार ३६५ क्षमतेपैकी पाच हजार ७७७ दशलक्ष घनफूट (६२ टक्के) जलसाठा झाला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६९ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी हे प्रमाण ९३ टक्के होते. पालखेड धरण समूहात ३९७० दशलक्ष घनफूट (४६ टक्के) जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ५१ टक्क्यांनी कमी आहे. ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव या तिन्ही धरणांणध्ये १२६६ दशलक्ष घनफूट म्हणजे ४० टक्के जलसाठा आहे. इगतपुरी तालुक्यातील धरणांची स्थिती चांगली आहे. भावली १०० टक्के भरले असून दारणामध्ये ७७ टक्के जलसाठा आहे. मुकणे (३३ टक्के) अपवाद वगळता उर्वरित वालदेवी (८०), नांदुरमध्यमेश्वर (९८), कडवा (८९), आळंदी (६३) आणि भोजापूरमध्ये (४०) टक्के जलसाठा आहे.
गिरणा खोऱ्यातील काही धरणांची स्थिती समाधानकारक असली तरी काही धरणांमध्ये फारसा जलसाठा झालेला नाही. चणकापूर (८७), पुनद (८२), हरणबारी (१००), केळझर (९१) टक्के जलसाठा आहे. नागासाक्या धरण अद्याप कोरडे ठोक असून गिरणामध्ये केवळ १९३४ दशलक्ष घनफूट म्हणजे १० टक्के जलसाठा आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पाणलोट क्षेत्रात पावसाची नितांत गरज आहे.
अखेरच्या टप्प्यात तो बरसला नाही तर पुढील आठ ते दहा महिने टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागेल.

इगतपुरीत धुवाधार
पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यास चार दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे घोटी आणि इगतपुरी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची भिस्त असलेले दारणा धरण ७६.९८ टक्के भरले आहे. पूर्व भागातही दमदार पाऊस झाल्याने कडवा धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. तर भावली धरणाचा कमी झालेला पाण्याचा साठा पूर्ववत झाला असून हे धरणही काल पुन्हा पूर्ण भरले आहे. इगतपुरी तालुक्यात सुरूवातीच्या काळात तब्बल महिनाभर पावसाने आगमन झाले, त्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर विश्रांती घेतल्याने तालुक्यातील धरणे भरतात की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र गेली चार दिवसापासून इगतपुरी तालुक्यात पुन्हा दमदार पाऊस झाल्याने तालुक्यातील दारणा, मुकणे, वैतरणा, कडवा, भावली आदी धरणाच्या साठय़ात लक्षणीय वाढ झाली आहे.यातील दारणा धरण ७७ टक्के भरले असून, कडवा धरण ओव्हरफ्लो झाले आहे तर भावली धरणही पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले आहे. दमदार पावसाने काही दिवसातच सरासरी भरून काढली. सोमवारी पावसाची संततधार कायम होती. २५ जुलै रोजी दारणा धरण ७८ टक्के भरले होते. तर याच दिवशी भावली धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले होते. मात्र मध्यंतरी महिनाभर पावसाने ओढ दिल्याने या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे दारणा पन्नास टक्क्यांवर तर भावलीच्या पातळीत लक्षणीय घट झाली होती. मात्र चार दिवसांच्या पावसामुळे या दोन्ही धरणाचा साठा पूर्ववत झाला आहे. पावसामुळे धरणे, बंधारे आणि तलाव ओसंडून वाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 7:20 am

Web Title: nashik rain details
Next Stories
1 घरगुती गणेशोत्सव सजावटीत कुंभमेळ्याचे प्रतिबिंब
2 घरफोडय़ांना उधाण, लाखोंचा ऐवज लंपास
3 न्या. व्यंकटेश दौलताबादकर यांचे निधन
Just Now!
X