News Flash

पाऊस रुसलेलाच!

जिल्ह्य़ात अकस्मात हजेरी लावून गायब झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वाचा जीव टांगणीला लागला आहे. दमदार पावसाअभावी पेरणीची कामे रखडली आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : जिल्ह्य़ात अकस्मात हजेरी लावून गायब झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वाचा जीव टांगणीला लागला आहे. दमदार पावसाअभावी पेरणीची कामे रखडली आहेत. या हंगामात आतापर्यंत जिल्ह्यत १६७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास हजार मिलिमीटरने हे प्रमाण कमी आहे.

वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यत आंब्याचे नुकसान झाले होते. हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज दिल्याने पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी आधीच करून ठेवली. महापालिकेने धरणात पुरेसा जलसाठा असल्याने पाणी कपात टाळली. परंतु जून महिन्यात काही अपवाद वगळता समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने धरणे ओसंडून वाहत असताना जिल्ह्यतील धरणांमध्ये पाणी पातळीत वाढ होईल, असा पाऊस झालेला नाही.

प्रशासनाच्या माहितीनुसार १ ते २१ जून या कालावधीत जिल्ह्यत १६७८ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. यात निम्म्यापेक्षा जास्त पाऊस इगतपुरी (४९६ मिलिमीटर), पेठ (२०१), त्र्यंबकेश्वर (२०३) आणि सुरगाणा (२३१) या चार तालुक्यांत झाला. उर्वरित सर्वच तालुक्यांत आजही पावसाची प्रतीक्षाच आहे. नाशिक तालुक्यात (५६), दिंडोरी (४५), मालेगाव (८२), नांदगाव (१०), चांदवड (५७), कळवण (४५), बागलाण (६६), देवळा (३३), निफाड (७७), याप्रमाणे जेमतेम पावसाची नोंद आहे.

धरणांमध्ये २७ टक्के जलसाठा

पावसाअभावी धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होऊ शकलेला नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यतील २४ लहान-मोठय़ा धरणांमध्ये १७ हजार ५३६ दशलक्ष घनफूट अर्थात २७ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी हेच प्रमाण १९ हजार ६२१ दशलक्ष घनफूट म्हणजे ३० टक्के इतके होते. जिल्ह्यतील धरणांची एकूण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २१४९ दशलक्ष घनफूट (३८ टक्के) जलसाठा आहे. उर्वरित बहुतांश धरणात यापेक्षा कमी जलसाठा आहे. काश्यपी (१७ टक्के), गौतमी गोदावरी (१२), आळंदी (९), पालखेड (३९), करंजवण (११), वाघाड (तीन), ओझरखेड (२६), पुणेगाव (सात), तिसगाव (दोन), दारणा (३४), भावली (३२), मुकणे (२२), वालदेवी (६६), कडवा (१५), नांदूरमध्यमेश्वर (९६), भोजापूर (१३), चणकापूर (३१), हरणबारी (३६), केळझर (१३), गिरणा (३२), पुनद (१४) असा जलसाठा आहे. नागासाक्या व  माणिकपूज  ही दोन धरणे कोरडीठाक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 12:31 am

Web Title: nashik rain heavy rain in nashik waiting for rain ssh 93
Next Stories
1 शाळांच्या मनमानीविरोधात नाशिक पालक संघटना आक्रमक
2 ‘स्मार्ट सिटी’कडून १०० कोटी मिळणार की नाही?
3 जागतिक योग दिवस विविध उपक्रमांनी साजरा
Just Now!
X