25 April 2019

News Flash

रमाबाई विद्यालयात बाबासाहेबांच्या अमूल्य ठेव्याची जीवापाड जपणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिकचे नाते सर्वश्रुत आहे.

नाशिक येथील रमाबाई कन्या विद्यालयात असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित कोट, टोपी, विजार आदी ठेवा. 

नाशिककर अनभिज्ञ असल्याची संस्थेची खंत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी शहर विविध कार्यक्रमांनी सज्ज होत असताना त्यांच्या स्मृती जपण्यासाठी राजकीय पक्ष, इतर संस्था, संघटनांपेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणाऱ्या रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात असलेल्या बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, स्तूप यांचीही स्वच्छता करण्यात येत आहे. नाशिकमध्ये बाबासाहेबांचा हा अमूल्य ठेवा असताना त्याविषयी बहुतांश नाशिककर आजही अनभिज्ञ असल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिकचे नाते सर्वश्रुत आहे. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहासह अन्य काही विषयांवरून बाबासाहेबांचा नाशिककरांना सहवास लाभला. या काळात बाबासाहेबांसमवेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड काम करत होते. बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थीही दादासाहेबांनी नाशिककरांच्या दर्शनासाठी आणल्या होत्या.

दरम्यान, शांताबाई दाणी यांनी डॉ. आंबेडकरांच्या अस्थी चांदीच्या पेटीत सांभाळून ठेवत त्याचे दर्शन सर्वाना घेता यावे यासाठी कोलकाता येथील स्तूपाची प्रतिकृती शाळेच्या आवारात उभारली. तथागतांनी दिलेला पंचशील, त्रिशरण आणि अष्टांग हा मार्ग कसा खडतर आहे, त्यापर्यंत तथागत कसे पोहचले, या संकल्पनेवर हा स्तूप तयार करण्यात आला आहे. या स्तूपात चंदेरी पेटीत आजही डॉ. आंबेडकरांच्या अस्थी दर्शनासाठी आहेत. शांतीदूत दलाई लामा यांच्यासह डॉ. आंबेडकरांचे पुत्रयशवंतराव आंबेडकर, नातू प्रकाश आंबेडकर तसेच इतर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट देत या ठेव्याचे दर्शन घेतले आहे.

आपल्या शहरातील या ठेव्याविषयी अधिक माहिती नसल्याने ६ डिसेंबर तसेच १४ एप्रिल या दिवसांव्यतिरिक्त नाशिककर या ठिकाणी फारसे फिरकतही नाहीत. बाहेरगावच्या शैक्षणिक सहली या ठिकाणी भेटीस येतात, परंतु स्थानिक पातळीवर शाळांनी आजवर भेट दिली नसल्याची खंत संस्थेचे पदाधिकारी हेमंत वाघ यांनी व्यक्त केली.

अमूल्य ठेव्याची काळजीपूर्वक जपणूक

कामानिमित्त होणाऱ्या भेटीगाठीदरम्यान बाबासाहेबांनी स्वातंत्र्योत्तर काळात दादासाहेब गायकवाड यांना आपला तपकिरी रंगाचा थ्रीपीस, दोन टोप्या, अर्ध विजार, तसेच इंग्लडमधील कंपनीची पादत्राणे भेट म्हणून दिले. दादासाहेबांनी हा अमूल्य ठेवा जपून ठेवला.  बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत असा ठेवा जतन करण्याचे अवघड काम दादासाहेबांनी स्वीकारले. शांताबाई दाणी यांच्यासोबत काम करत असतांना खडकाळी परिसरातील किस्मत बाग येथे भरणाऱ्या मुलींच्या शाळेतील कार्यालयात हे साहित्य ठेवण्यात आले. पुढे १९८२ मध्ये रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय वास्तू आकारास आल्यानंतर दादासाहेबांनी डॉ. आंबेडकरांशी संबंधित हा सर्व अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी शाळेकडे सोपविला. शाळेच्या मुख्य कार्यालयात काचेच्या पेटीत हा ठेवा आजही आहे.

First Published on April 14, 2018 1:04 am

Web Title: nashik ramabai school preserved babasaheb ambedkar things