तळेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर दोन दिवस तणावपूर्ण राहिलेली स्थिती निवळत आहे. मागील तीन ते चार दशकांत नाशिक जिल्ह्यात सामाजिक शांतता टिकून आहे.

सध्या निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी सर्वसमावेशक नेतृत्वाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी प्रबोधन करणे तसेच बंधूभाव जोपासण्यासाठी गावोगावी संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्याची संकल्पना सामाजिक क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मांडली. नाशिक जिल्ह्यत शांतता प्रस्थापित करण्यासाठी संबंधितांनी सुचविलेले उपाय, त्यांच्याच शब्दात..

तरुणाईच्या प्रबोधनाची गरज

जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होत आहे. भ्रमणध्वनीवरील इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे नाहक पसरणाऱ्या अफवांना प्रतिबंध घातला गेला. तळेगावच्या प्रकरणात राज्य शासन व पोलीस यंत्रणेने योग्य पध्दतीने काम केले. चिमुरडीवरील अत्याचाराचा प्रयत्न, बसची तोडफोड व जाळपोळ या सर्व घटनांमधून तरुण वर्गाची विकृती दिसून येते. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी सर्व घटकांनी पुढे येण्याची गरज असून त्यासाठी भरकटलेल्या तरुणाईला योग्य दिशा दाखविण्यासाठी प्रबोधन करणे अत्यावश्यक आहे. भविष्यात कोणत्याही घटनेवेळी उद्रेकाची शक्यता वाटल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे त्यांना लक्षात आणून देण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यायला हवा. एखाद्या स्थानिक नेत्यामागे तरुणाई भरकटते. त्यावेळी संबंधितांना गांभिर्य लक्षात येत नाही. एखाद्या बस वा वाहनाचे नुकसान झाल्यास काय शिक्षा होऊ शकते याची जाणीव त्यांना करुन द्यायला हवी. याद्वारे दाखल होणाऱ्या गुन्ह्यामुळे संबंधित तरुणाचे आयुष्य अंधकारमय होऊ शकते. या संदर्भातील माहिती सातत्याने संबंधितांना दिली गेली पाहिजे. या स्वरुपाच्या प्रबोधनाद्वारे तरूण वर्ग हिंसात्मक मार्गापासून दूर राहील. शांततामय मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा विचार त्याला देण्याची गरज आहे.

नीलिमा पवार (सरचिटणीस, मविप्र शिक्षण संस्था)

सर्वसमावेशक नेतृत्वाने शांततेसाठी पुढाकार घ्यावा

महाराष्ट्राच्या एकूणच सामाजिक प्रतिमेला तडा देणाऱ्या या घटना असून यामुळे संपूर्ण समाजमन बिघडले आहे. महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाची भूमिका लोप पावल्याचे या घटनांमधून दिसत आहे. राज्याचे पुरोगामित्व ५० वर्षांनी मागे गेल्यासारखी सध्याची स्थिती आहे. यातून सर्वच समाज घटकांनी बोध घेऊन महाराष्ट्राची एकूणच पुरोगामित्वाची प्रतिमा जपायला हवी. नाशिक जिल्ह्यात मागील ३५ ते ४० वर्षांत दोन्ही समाजाने सामाजिक शांतता टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच पध्दतीने नाशिक शहरात व एकूणच जिल्ह्यात ती टिकविण्याची आज गरज आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दोन्ही कार्यकर्त्यांनी एकदिलाने आज समोर येण्याची खरी आवश्यकता आहे. नाशिक जिल्हा यापूर्वी जातीय वणव्यातून गेला नाही असे नाही. परंतु, तत्कालीन राजकीय धुरिणांनी आणि सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य कार्यकर्त्यांनी पुढे येऊन नाशिकमध्ये शांतता ठेवण्याचे कार्य केले होते. तथापि, आज नेतृत्वहीन समाज रस्त्यावर येऊन उद्रेक करतो आहे, तो नाशिकच्या भविष्यासाठी घातक ठरेल. म्हणून सर्वसमावेशक नेतृत्वाने पुढे येऊन सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी जोमाने रस्त्यावर उतरले पाहिजे. समाजातील भरकटलेल्या दोन्ही घटकांना नियंत्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

संदीप डोळस (सरचिटणीस, समता अभियान)

माध्यमांनी भान ठेवावे

या सर्व घडामोडीस प्रसारमाध्यमे मुख्यत्वे जबाबदार आहेत. प्रसिध्दीच्या झोतात राहण्याची अनेकांना खुमखुमी असते. माध्यमांमुळे लोकांना स्फुरण चढते. काही केल्याचे समाधान मिळते. त्यामुळे काही निमित्त मिळाले की हे घटक गैरफायदा घेतात. कारण किती गंभीर आहे ते पाहिले जात नाही. माध्यमांनी कोणत्याही घटनेला एका मर्यादेत ठेवल्यास हे प्रकार वाढणार नाहीत. कोणत्याही विकृतीला जात, पात, धर्म असे बंधन नसते. या स्थितीचा समोरच्याला कोंडीत पकडून काही लाभ होतो का हे पाहणारे काही घटक तयार झाले आहेत. संपूर्ण शासकीय यंत्रणा कार्यरत असताना पालकमंत्र्यांनी तातडीने येण्याची गरज नव्हती. राजकीय व जातीय भाग वगळून उपरोक्त घटनेबाबत विश्लेषण व्हायला हवे. त्याची खरी कारणे शोधून हे का घडते, हे पाहिले पाहिजे.

डॉ. गिरधर पाटील (सामाजिक कार्यकर्ते)

गावोगावी संयुक्त कार्यक्रम घ्यावेत

नाशिक जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाने दोन्ही समाजातील नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन त्या त्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची नैतिक जबाबदारी त्या त्या भागातील नेते व कार्यकर्त्यांवर टाकली पाहिजे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे गावातील पुढाऱ्याची मोठे होण्यासाठी धडपड सुरू आहे. शासकीय यंत्रणेने गावात समाज घटकांची एकत्रित बैठक, महापुरूषांना अभिवादन असे संयुक्त कार्यक्रम घेऊन बंधूभाव जोपासला जाईल असा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या गावात या स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही, त्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार नाही असे प्रशासनाने सूचित करावे. तळेगावची घटना निंदनीय आहे. संशयिताला कोणतीही जात नसते. प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन करताना तसा उल्लेख टाळायला हवा. दुदैवी घटना घडल्यानंतर जात विचारण्याची उदयास येऊ पाहणारी पध्दत रोखायला हवी.

डॉ. संजय जाधव (सामाजिक कार्यकर्ते)