नाशिक : जवळपास महिनाभरापासून प्रतीक्षा करायला लावणारा आणि हवामान विभागाने अतिवृष्टीचे इशारे देऊनही रिमझिम स्वरूपातदेखील हजेरी न लावणाऱ्या पावसाने बुधवारी दुपारी शहर परिसरात काहीशी दमदार हजेरी लावली. दुपारपासून कधी रिमझिम, तर कधी दमदार स्वरूपात सरी कोसळल्याने नाशिककरांना यंदा प्रथमच पावसाळ्याची अनुभूती मिळाली. मागील २४ तासांत जिल्ह्य़ात २०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुंबईसह कोकण विभागात मुसळधार पाऊस सुरू असताना नाशिकमध्ये रिमझिम स्वरूपातही पाऊस झालेला नव्हता. जिल्ह्य़ातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा हे तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांत दमदार पावसाअभावी पेरणीची कामे रखडलेली आहेत. मागील आठवडय़ात हवामान विभागाने सलग चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता; परंतु या काळात उपरोक्त तालुके वगळता इतरत्र जेमतेमही पाऊस झाला नाही. मागील काही वर्षांत प्रारंभी हजेरी लावणारा पाऊस नंतर अंतर्धान पावल्याची उदाहरणे आहेत. यंदा तो सुरुवातीपासून गायब असल्याने पेरणी, पाणीटंचाईचा प्रश्न बिकट झाला आहे. या स्थितीत जिल्ह्य़ातील काही भागांत बुधवारी पावसाने हजेरी लावली. मागील २४ तासांत जिल्ह्य़ात २०२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात सर्वाधिक इगतपुरी तालुक्यात ६६, पेठ ३६, सुरगाणा २८ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात २१ मिलिमीटरची नोंद झाली.

नाशिक, दिंडोरी, नांदगाव, मालेगाव, बागलाण, कळवण या तालुक्यांत त्याने तुरळक स्वरूपात हजेरी लावली होती. बुधवारचा दिवस काही अंशी अपवाद ठरला. दुपारी नाशिक शहरासह आसपासच्या भागांत संततधारेला सुरुवात झाली. पावसाने सखल भागात पाणी साचले. पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

इगतपुरीत मुसळधार

बहुतांश तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा करावी लागली असली तरी इगतपुरी त्यास अपवाद ठरला. रात्रीपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत हंगामात एक हजार मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे परिसरातील धरणांमधील जलसाठा उंचावत आहे. घाटमाथ्यावरील इगतपुरी, भावली, मानवेढे, काळूस्ते वैतरणा परिसरातील शेती जलमय झाली आहे. धरण परिसरात संततधार सुरू आहे. यामुळे जलसाठय़ाची पातळी उंचावण्यास सुरुवात झाली. दारणा, भावली धरणांत कमालीची वाढ झाली आहे. दारणा धरणात ३९ टक्के, तर भावली धरणात ४१ टक्के जलसाठा झाला आहे. तसेच मुकणे धरणात सहा टक्के, तर कडवामध्ये १२ टक्के जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.