नाशिक : शहरात करोनाचा संसर्ग वाढत असून २४ तासात यामध्ये नव्याने १६८ रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या ४३७८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत करोनामुळे १८१ जणांचा मृत्यू झाला. तर २७९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सद्यस्थितीत १४०० रुग्ण उपचार घेत आहेत. १६४ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत.

शहरातील सर्व भागात करोनाचा प्रसार वेगाने होत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. ताप, खोकला अशी लक्षणे असणारे नवीन ३६६ संशयित मंगळवारी दाखल झाले. सध्या अशी लक्षणे असणारे २२८८ जण उपचार घेत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. अशी लक्षणे आढळणाऱ्या १६ हजार २७२ संशयितांना आजपर्यंत दाखल करण्यात आले होते. त्यातील १३ हजार ९९२ जणांना घरी सोडण्यात आले. यातील २३०४ जणांना करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवालातून उघड झाले होते. मंगळवारी ९०५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ६८२ संशयिताचा अहवाल नकारात्मक तर १६८ जणांचा अहवाल सकारात्मक आला. एकूण रुग्णांपैकी सध्या १९० रुग्ण घरगुती अगलीकरणात आहेत. याच दिवशी विलगीकरण कक्षातून ३७ रुग्ण बरे झाल्याची माहिती महापालिकेच्या करोना केंद्राचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी दिली. शहरात आतापर्यंत १८ हजार ७९४ जणांचे नमुने घेण्यात आले. त्यातील १४ हजार ४९३ जणांचे नमुने नकारात्मक आले. तर ४३६६ जणांचे अहवाल सकारात्मक आले. महापालिका हद्दीतील १२ आरोग्य कर्मचाऱ्यांचे अहवाल सकारात्मक आले होते. वाढत्या रुग्णांमुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही विस्तारत आहे. सध्या ३०० प्रतिबंधित क्षेत्र असून त्यात २७७ इमारतीचे तर २३ सूक्ष्म क्षेत्रांचा समावेश आहे. याआधी विहित कालावधी पूर्ण करणारे ४३० प्रतिबंधित क्षेत्र बंद करण्यात आल्याचे महापालिकेने अहवालात म्हटले आहे.