रेल परिषदेचे रेल्वेमंत्र्यांना साकडे
‘स्मार्ट सिटी’ची मनीषा बाळगणाऱ्या नाशिकला सर्व दृष्टिकोनातून स्मार्ट बनविण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सिंहस्थात तात्पुरत्या स्वरूपात बसविलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा प्रवाशांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी कायमस्वरूपी करावी, अशी मागणी रेल परिषदेने केली आहे. कुंभमेळ्यातील प्रमुख तीन पर्वण्या पार पडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात बसविलेली ही यंत्रणा काढण्याचे आदेश दिले गेले. परंतु, रेल परिषदेने पुढाकार घेऊन हे काम थांबविले. रेल्वे स्थानकावर त्याची नितांत आवश्यकता असून ते कायमस्वरूपी करावेत, अशी मागणी परिषदेने रेल्वेमंत्र्यांकडेही केली आहे.
सिंहस्थात देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने शासनाने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर विविध सुविधा निर्माण केल्या. त्यात काही तात्पुरत्या होत्या तर काही कायमस्वरूपी. कुंभमेळ्यानिमित्त उपलब्ध झालेल्या कायमस्वरूपी सुविधांचा लाभ स्थानिकांना होणार आहे. या प्रक्रियेत नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. गर्दीसह स्थानकावरील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्याचे काम त्यामार्फत करण्यात आले. सिंहस्थ काळात रेल्वेतून तब्बल १८ लाख भाविकांनी प्रवास केला. लाखोंच्या संख्येने भाविक स्थानकावरून ये-जा करत असताना सीसीटीव्ही यंत्रणेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या यंत्रणेमुळे अनेक चोऱ्या होण्याआधी थांबविता आल्या. पर्वणी काळात नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अनुचित प्रकार घडू नये तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी १००हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण काही अंशी हलका झाला तसेच भुरटय़ा चोऱ्यांसह घातपाताच्या कारवायांवर अंकुश ठेवता आला. अनेक हरविलेल्या व्यक्ती व बालके यांचा शोध घेत त्यांना त्यांच्या आप्तांच्या हवाली करता आले. चोरटय़ांनाही गजाआड करता आले. स्थानकावरील सीसीटीव्हीचे काम खासगी संस्थेमार्फत करणयात आले होते. त्याची मुदत संपल्याने सारी यंत्रणा परत काढण्याचे आदेश आले. अनेक ठिकाणी फलाट खोदून केबल टाकून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ही संपूर्ण यंत्रणा काढायची म्हणजे फलाटाखालील वायर काढाव्या लागतील. त्यासाठी खोदकाम अटळ असून त्यामुळे फलाटांचे नुकसान होणार असल्याकडे रेल्वे परिषदेने लक्ष वेधले. या यंत्रणेद्वारे समाजविघातक कारवायांना आळा बसू शकतो. सिंहस्थात महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्याचा उपयोग झाला. चोरीच्या घटनांमध्ये संशयितांना पकडण्यास मदत झाली. सिंहस्थ वगळता देशभरातील भाविक तीर्थाटनासाठी नाशिकला वर्षभर येत असतात. उत्तर महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने ही यंत्रणा कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवणे गरजेचे आहे. शहर स्मार्ट सिटी होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी यांनी केले आहे.