शिकाऊ वाहन परवाना परीक्षेत ७७ टक्के उत्तीर्ण

शहरी आणि ग्रामीण भागात शिकाऊ वाहन चाचणी कार्यपद्धतीत एकसमान धोरण आणण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने टॅबच्या आधारे निर्मिलेल्या शिकाऊ वाहन परवाना चाचणीचा प्रयोग यशस्वी ठरल्याचे अधोरेखित झाले आहे. अशिक्षित किंवा संगणकाचे ज्ञान नसलेल्या अर्जदारालाही मराठी भाषेतून ही चाचणी सहजपणे देणे शक्य झाले आहे. घेण्यात आलेल्या शिकाऊ वाहन परवाना परीक्षेत ७७ टक्के अर्जदार उत्तीर्ण झाले आहेत.

शिकाऊ वाहतूक परवान्यासाठी २००३ मध्ये नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात संगणकीय चाचणी घेण्याची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली होती. या प्रणालीत अर्जदाराला एकूण दहा प्रश्न विचारले जातात. त्यापैकी सहा प्रश्नांची उत्तरे अचूक देणारा अर्जदार परीक्षेत उत्तीर्ण घोषित करण्यात येत होते. अर्जदार ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय त्याला शिकाऊ वाहतूक परवाना दिला जात नाही.

शासनाने या प्रणालीची दखल घेऊन टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर कार्यालयांमध्ये या प्रणालीचा वापर सुरू केला आहे.

या प्रणालीचा वापर १३ वर्षांपासून सुरू असला तरी तो केवळ मुख्यालयात करता येतो. संगणकीय आज्ञावलीमुळे या प्रणालीचा वापर ग्रामीण भागातील शिबिरांमध्ये करता येऊ शकत नव्हता. त्या ठिकाणी पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने अर्जदाराची तोंडी परीक्षा घेऊन शिकाऊ वाहन चालविण्याच्या परवाना देण्याचे काम केले जात होते.

यामुळे शिबिरांमधील चाचणीत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा अभाव होता. ही बाब लक्षात घेऊन शहरी-ग्रामीण भागातील शिकाऊ परवाना प्रणालीत एकसमानता आणण्यासाठी या चाचणीसाठी टॅब बेस प्रणाली विकसित करून घेण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळस्कर यांनी सांगितले.

या प्रणालीत परीक्षेसाठी वापरण्यात येणारी प्रश्नावली शासनमान्य आहे. या प्रणालीत संगणकीय चाचणीच्या धर्तीवर अर्जदाराला दहा प्रश्न विचारले जातात.

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तीन पर्याय देऊन त्याला एक पर्याय निवडावा लागतो. किमान सहा प्रश्नांची उत्तरे देणारा अर्जदार उत्तीर्ण होऊन त्याला शिकाऊ परवाना दिला जातो, असेही त्यांनी सूचित केले.

ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी आरटीओ कार्यालयामार्फत ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जाते. शिकाऊ वाहतूक परवान्यासाठी टॅबची प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर चाचणीची गुणवत्ता वाढून योग्य उमेदवारास परवाना देणे शक्य झाल्याकडे कळस्कर यांनी लक्ष वेधले. टॅबसाठी प्रायोजकत्व मिळाल्याने शासनावर आर्थिक भार पडला नाही. सध्या सहा टॅबद्वारे ग्रामीण भागातील शिबिरांमध्ये ही चाचणी घेतली जात असल्याचे कळस्कर यांनी सांगितले.

टॅबवर आधारित प्रणालीचे फायदे

या प्रणालीमुळे चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या अर्जदारासच म्हणजे योग्य उमेदवारास शिकाऊ वाहन परवाना मिळतो. शहरी-ग्रामीण भागात शिकाऊ वाहन परवाना घेण्याच्या पद्धतीत एकसमानता आली. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही या प्रणालीचा वापर केल्याने शहरी-ग्रामीण डिजिटल दरी कमी झाली. शिबिरांमधील कार्यपद्धतीत पारदर्शकता आली. टॅबवरील चाचणीला इंटरनेटची आवश्यकता नसल्याने दुर्गम भागातही तिचा वापर करता येतो. टॅबच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च संगणकापेक्षा कमी आहे. टॅबची किंमत सहा ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान असल्याने ही योजना खर्चिक नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळस्कर यांनी सांगितले.

२३ टक्के अर्जदार अनुत्तीर्ण

नाशिक आरटीओच्या कार्यक्षेत्रात आयोजित होणाऱ्या सर्व शिबिरांमध्ये जुलै २०१६ पासून टॅबवर आधारित चाचणी प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला. आतापर्यंत या प्रणालीद्वारे १५ हजार ८८ अर्जदारांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये ११ हजार ६१८ (७७ टक्के) अर्जदार उत्तीर्ण झाले तर ३४७० अर्थात २३ टक्के अर्जदार अनुत्तीर्ण झाले आहेत.