News Flash

ड्वेन ब्राव्होच्या ‘रन द वर्ल्ड’ मध्ये नाशिकचा सचिन खैरनार

मैत्रीची वीण कायम ठेवत आयपीएलच्या हंगामात ब्राव्होने तयार केलेल्या आपल्या ‘रन द वर्ल्ड’ या गाण्याच्या चित्रीकरणात या युवकाचाही समावेश केला आहे.

क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होसमवेत सचिन खैरनार 

मैत्रीची वीण आंतराष्ट्रीय पातळीवर

सध्या सर्वत्र आयपीएलची धूम सुरू असताना येथील एक युवक एखाद्या भारतीय क्रिकेटपटूपेक्षा प्रत्येक सामन्यात वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने सुरेख खेळ करावा, अशी प्रार्थना करीत असतो. त्यास कारणही तसेच. दोन वर्षांपूर्वी एका टीव्ही वाहिनीच्या कार्यक्रमानिमित्त ब्राव्होशी झालेली भेट या नाशिककर युवकास आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन गेली आहे. मैत्रीची वीण कायम ठेवत आयपीएलच्या हंगामात ब्राव्होने तयार केलेल्या आपल्या ‘रन द वर्ल्ड’ या गाण्याच्या चित्रीकरणात या युवकाचाही समावेश केला आहे.

येथील नृत्य प्रशिक्षक सचिन खैरनार ब्राव्होमय होण्याची अशी अनेक कारणे आहेत. सचिनने  विविध वाहिन्यांवरील नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग तर काही वेळा नृत्य दिग्दर्शनाचे काम केले आहे. मागील वर्षी कलर्स वाहिनीतर्फे ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमासाठी सचिनला आमंत्रित केले. प्रसिद्ध व्यक्तींना खास नृत्यासाठी या कार्यक्रमात बोलविण्यात आले होते. त्यात ब्राव्होचाही समावेश होता. ब्राव्होला नृत्य शिकविण्याची जबाबदारी सचिनवर टाकण्यात आली. त्या कार्यक्रमापासून ब्राव्होशी झालेली मैत्री अजूनही टिकून आहे. त्यामुळेच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ब्राव्होच्या कामगिरीवर सचिनची विशेष नजर असते. ब्राव्हो उत्तम क्रिकेटपटू तर आहेच, शिवाय चांगला गायकही आहे.

आयपीएल दरम्यान जगभरातील लोकांना क्रिकेटविषयी काय वाटते, हे सांगण्यासाठी ब्राव्होने ‘रन द वर्ल्ड’ हे गीत तयार केले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणात इंग्लंड, जमैका, आफ्रिका, फ्रान्स आणि भारताचा समावेश आहे. या गाण्यात क्रिकेटविषयक भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. या गाण्यात भारतातील चित्रीकरणात ब्राव्होने सचिनलाही सामील करून घेतले. त्यामुळे ‘रन द वर्ल्ड’ मध्ये नाशिककर सचिनही दिसतो. मुंबईत आयोजित सामन्यासाठी ब्राव्हो दाखल झाल्यावर त्याने आपल्या या नाशिककर मित्राची खास आठवण ठेवत त्यास मुंबईत भेटीसाठी बोलवून घेतले. मुंबईतील तारांकित हॉटेलमध्ये सचिन आणि ब्राव्हो यांनी आठ तास एकत्र घालविले. या दरम्यान सचिनने ब्राव्होला नाशिकची मिसळ, भारतातील नावीन्यपूर्ण ठिकाणे, संगीत, नृत्य याविषयी माहिती दिली. यावेळी आयपीएलमध्ये सहभागी झालेले जे खेळाडू भेटले, त्या सर्वाशी ब्राव्होने सचिनची ‘आपला चांगला मित्र’अशी ओळख करून दिली.

ब्राव्होचा हा साधेपणा सचिनला प्रभावित करून गेला. समाजमाध्यमात या भेटीविषयी सचिनने ब्राव्होच्या साधेपणाचे गुणगान गायल्यावर ब्राव्होने तत्काळ त्यावर कोणीही लहान किंवा मोठे नसते. माणूस म्हणून आपण सर्व समान असल्याची प्रतिक्रिया देत आपल्या मनाचा मोठेपणाही दाखवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:36 am

Web Title: nashik sachin khairnar in dwayne bravo run the world
Next Stories
1 बातमी देताना काहीतरी शरम बाळगा, सुवर्णकन्या मनू भाकेरने फटकारलं
2 मराठमोळ्या तेजस्विनी सावंतने जिंकली भारतीयांची मनं, राष्ट्रकुल स्पर्धेतलं पदक शहीद जवानाला केलं समर्पित
3 एबी डिव्हीलियर्समुळे आफ्रिकेत माझी फलंदाजी बहरली – विराट कोहली
Just Now!
X