शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी विरोधी पक्षांतर्फे संघर्ष यात्रा सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रा सोमवार दि. १७ व मंगळवार दि.१८ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात येत आहे. या संघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, खा.अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार, विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटल, ना.धनंजय मुंडे, माजी मंत्री आ.सुनिल तटकरे, आ.जयंत पाटील, आ.जितेंद्र आव्हाड, प्रा.जोगेंद्र पाटील, आ.अबू आझमी, गणपतराव पाटील यांच्यासह शेकडो आमदार सहभागी होणार आहेत.

संघर्ष यात्रा मार्ग

या संघर्ष यात्रेत सोमवार दि. १७ एप्रिल रोजी सकाळी १० वा. मालेगाव येथील गिरणा पुलाजवळ मनमाड चौफुलीवर, दुपारी २ वा. सटाणा येथे, सायंकाळी ४.३० वा.पिंपळगाव बसवंत येथे सभा होतील. तर संघर्ष यात्रेतील सहभागी नेते व आमदार पाच पैसे किलो भावाने कांदा विकला गेलेल्या नामपूर बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी ३.३० वा. देवळा येथील पाचकंदील चौकात, दुपारी ४ वा. वडाळीभोई येथे तर सांय. ६ वा. आडगावमध्ये संघर्ष यात्रेचे मोठे स्वागत केले जाणार आहे.

मंगळवार दि.१८ एप्रिल रोजी समृद्धी महामार्गामुळे विस्थापित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी देवळाली कॅम्प, भगूर, पांढुर्लीमार्गे संघर्ष यात्रा शिवडा येथे जाईल. शिवडा येथे ‘समृद्धी’ ग्रस्त शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर घोटी येथे दुपारी १ वाजता सभा होणार आहे. त्यानंतर संघर्ष यात्रा घोटीमार्गे शहापूरकडे रवाना होईल. या संघर्ष यात्रेत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी व युवतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शेकापचे अॅड.मनीष बस्ते, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष इम्रान चौधरी, रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे शशिकांत उन्हवणे आदींनी केले आहे.